अमृतवाहिनी बँकेला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन!

अमृतवाहिनी बँकेला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन!
Published on

ID: GHR26A09243
संगमनेर ः अमृतवाहिनी सहकारी बँकेला मिळालेल्या आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र दाखविताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे.

अमृतवाहिनी बँकेला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन
ग्राहकसेवा, कार्यपद्धती व अंतर्गत नियंत्रणाचा उच्च दर्जा अधोरेखित
संगमनेर, ता. २६ ः सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. बँकेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. हे मानांकन बँकेच्या ग्राहकसेवा, कार्यपद्धती आणि अंतर्गत नियंत्रण प्रणालीच्या उच्च दर्जाचे निदर्शक असल्याचे गौरवोदगार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेडच्या कॉर्पोरेट प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात बँकेला नुकतेच प्राप्त झालेले आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र बँकेकडे सुपूर्द करण्यात आले.
बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी म्हणाले, हे मानांकन बँकेच्या संचालक मंडळ, व्यवस्थापन आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दिशेने बँकेने उचललेले हे पाऊल ठेवीदार, सभासद आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करणारे आहे, तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुशासन व अंतर्गत नियंत्रणासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत कार्यपद्धती राबविण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेचे उपाध्यक्ष ॲड. नानासाहेब शिंदे यांनी बँकेच्या विस्ताराची माहिती देताना धांदरफळ आणि इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे लवकरच दोन नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच अमृत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक कर्ज सुविधा आणि ‘रूफ टॉप सौरऊर्जा योजना’ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक मंडळ, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, बँकेचे ग्राहक तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--------
गुणवत्ता मानांकनासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव
आयएसओ मानांकन मिळविण्याच्या प्रक्रियेत गेल्या अनेक महिन्यांपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावून या प्रक्रियेचे नेतृत्व करणारे अमोल घुले आणि विवेक सोनवणे यांचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बँकेच्या कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा, गुणवत्ता व्यवस्थापनाची अंमलबजावणी आणि मानांकनासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या दोन्ही कर्मचाऱ्यांनी केलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com