Ananat chaturdashi 2020 : मानाच्या पाच गणपतींचे तीन तासांत विसर्जन  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anant chaturthi 2020 Immersion of five main Ganpati of pune in three hours

साडे अकरा वाजता कसबा, तर दीड वाजता केसरीवाडा गणपती विसर्जन 

Ananat chaturdashi 2020 : मानाच्या पाच गणपतींचे तीन तासांत विसर्जन 

पुणे : शंखनाद, ढोल ताशांचा निनाद आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर असा घोष करीत चैतन्यमय वातावरणात आज पुण्यातील मानाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदा मनोहारी सजावटींच्या मिरवणुकीशिवाय गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यंदा दुपारी दीड वाजेपर्यंत मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालणारी मिरवणूक. प्रत्येक मंडळाच्या आकर्षक आरास पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा होणारी प्रचंड गर्दी. ढोले ताशे, झांज नगाऱ्यांचा गजर, ढोल पथकांचे वादन असे यंदा झाले नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अगदी पारंपरिक; परंतु साध्या पद्धतीने उत्सव मंडपासमोरच मंडळांनी आरती करीत बाप्पांना निरोप दिला. विसर्जनाच्या दिवशी रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने करूनही अनेक नागरिक मानाच्या गणपतींचे विसर्जन पाहण्यासाठी आले होते. बाप्पांना निरोपाचा सोहळा ते मोबाइलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून घेत होते. 

सकाळी साडेदहाच्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपतीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हार घातला. त्यानंतर आरती करून साडेअकराच्या सुमारास मंडळ परिसरात तयार केलेल्या हौदात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्‍वरी मंडळाच्या गणपतीला निरोप देण्यात आला. शंखनाद करीत, गणपती बाप्पा मोरया निनाद करीत मंडपा समोरील छोटेखानी हौदाजवळ महापौर आणि मंडळाचे कार्यकर्त्यांच्या उपस्थिती आरती करण्यात आली. त्यानंतर पाऊणच्या सुमारास बापांचे विसर्जन करण्यात आले. 

पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुक होणार ढोल-ताशाविना

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणेश मंडळाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व काळजी घेत मंडपाला लागून लोखंडी बॅरिकेड लावले होते. त्यात कुणाला प्रवेश करू दिला जात नव्हता. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा यांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. या ठिकाणी रवींद्र धंगेकर आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. नंतर एक वाजता गणपती विसर्जन करण्यात आले. 
मानाचा चौथी तुळशीबाग मंडळाचा गणपती. तेथेही सर्व खबरदारी घेऊन आरती करण्यात आली. त्यानंतर लक्ष्मी रस्त्याच्या दिशेने पालखीत बाप्पांची मिरवणुक काढण्यात आली. लगेचच परत फिरून मुख्य मंडपासमोरील हौदात सव्वाच्या सुमारास मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. केसरीवाडा गणपतीची आरती महापौर, माजी महापौर मुक्ता टिळक, दीपक टिळक आदींच्या उपस्थिती झाली. नंतर सनई चौघड्याच्या निनादात बाप्पांना निरोप देण्यात आला.