आंद्रा, भामाचा प्रस्ताव मंजूर

आंद्रा, भामाचा प्रस्ताव मंजूर

पिंपरी - आंद्रा व भामा आसखेड धरणांतून पिंपरी-चिंचवड शहरासाठी २.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याच्या महापालिकेच्या फेरप्रस्तावाला पाच मंत्र्यांच्या उपसमितीने मंजुरी दिली आहे. येत्या दोन-तीन वर्षांत शहराला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात एक टीएमसीने वाढ झाल्यास त्याचा फायदा सध्या पाणीटंचाईने हैराण झालेल्या व सध्या वेगाने विकसित होत असलेल्या शहराच्या पूर्व भागातील लोकांना होईल. 

आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडलेले सुमारे १०१ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देहू बंधाऱ्याजवळ उचलण्यात येईल. ते चिखलीत आठ हेक्‍टर जागेवरील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात नेण्यात येईल. इंद्रायणीकाठी असलेल्या तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी, चऱ्होली, दिघी येथील रहिवाशांना तेथून पाण्याचे वितरण येईल. पवना धरणातून मिळणारे पाणी सध्या तेथे पुरविले जाते. ते वाचलेले शंभर एमएलडी पाणी शहराच्या अन्य भागांत दिल्यास शहराची पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे.

पुण्याला भामा आसखेड धरणातून पाणी मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही जादा पाणी आरक्षणाची मागणी केली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नाने लोकसभा निवडणुकीपूर्वी सहा मार्च २०१४ रोजी आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पांतून शहरासाठी पाणी घेण्यास मंजुरी मिळाली. मात्र, धरणांसाठीच्या पुनर्स्थापना खर्चापोटी २३७ कोटी पालिकेने न भरल्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जलसंपदा विभागाने परवानगी रद्द केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एप्रिल २०१८ मध्ये फेरप्रस्ताव सादर केला. आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केल्यानंतर जुलैमध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात तत्त्वतः मंजुरी देण्याचे ठरले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी उपसमितीतील मंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर या फेरप्रस्तावाला सोमवारी मंजुरी मिळाली. 

असा आहे प्रकल्प 
आंद्रा धरणातून १०१ एमएलडी पाणी तेथून सहा किलोमीटरवरील, तर भामा आसखेड धरणातून १६६ एमएलडी पाणी तेथून नऊ किलोमीटरवरील नवलाख उंब्रे येथे नेण्यात येईल. तेथून दीड हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यात येईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याचा डीपीआर बनविलेला आहे. दरम्यानच्या काळात देहू येथील बंधाऱ्यापासून जलवाहिनीने आठ किलोमीटर अंतरावरील चिखली जलशुद्धीकरण केंद्रात पाणी नेण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांकडून चिखलीच्या गायरानाची जागा गेल्या वर्षी महापालिकेच्या ताब्यात मिळाली.

महापालिकेची कारणे मान्य करीत त्यांचा फेरप्रस्ताव मान्य करताना पाच टप्प्यांत पुनर्स्थापना खर्चाची रक्कम भरण्यात मंत्र्यांच्या उपसमितीने मान्यता दिली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाण्यासंदर्भातील सर्व मागण्या मान्य केल्या.  
- ए. ए. कपोले, उपसचिव, जलसंपदा विभाग

महापालिकेने या कामाच्या सर्व निविदा तयार केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात देहू बंधाऱ्यापासून पाणी घेण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात भामा आसखेडचे पाणी घेतले जाईल. दोन-तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करू. इंद्रायणी खोऱ्यातील भागात वीस ठिकाणी टाकी बांधण्यात येतील. त्याद्वारे पाणी दिल्यामुळे वीजबिलात मोठी बचत होईल. राज्य सरकारकडून रक्कम भरण्याबाबतच्या आणि अन्य अटी आल्यानंतर याबाबतचे निर्णय घेऊ.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com