‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ला अंगणवाडी सेविकांचा विरोध

Anganwadi-Employee
Anganwadi-Employee

पुणे - बालक, स्तनदा, गर्भवतींना पोषण आहार पुरवायचा. कमी वजनांच्या मुलांचा शोध घ्यायचा. अंगणवाडी सेविकांना ठरवून दिलेली ही कामे सुरूच आहेत. त्यात पुन्हा सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत सर्वेक्षण करायला सांगितलं. यापूर्वी कोरोनाचा तीनवेळा सर्वे केलाय. घरोघरी जाऊन कोणाला ताप, शुगर-बीपी आहे का विचारलं. कोणतीही सरकारी योजना आली की बोलवा अंगणवाडी सेविकांना... नाही म्हटलं की नोटिशीची धमकी... पगार इतभर आणि काम हातभर... जीव धोक्‍यात घालून सर्वेक्षण करावं लागतंय... ही संतप्त अन प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेची.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत कोरोना सर्वेक्षणाला अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शविला आहे. या मोहिमेत दररोज ५० घरांना भेटी देऊन तापमान तपासणी, कोरोनाबाबत मार्गदर्शन करायचे आहे. ४० दिवस ही मोहीम सुरू राहील. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे आहारवाटप, वजन घेणे, गृहभेटी, पालक-मुलांशी संवाद, कमी वजनाच्या मुलांची शोधमोहीम माहिती अपलोड करण्याची जबाबदारी आहे. त्यात पुन्हा या मोहिमेत अंगणवाडी सेविकांना समाविष्ट करू नये. योजनाबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नयेत. अन्यथा २१ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी नियमित योजनेतील कामे वगळता अन्य कामात सहभागी होणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंगणवाडी कर्मचारी अत्यल्प मानधनात काम करतात. त्याही माणूसच आहेत. रोबोट नाहीत. तिलाही स्वत:चे कुटुंब आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढत आहे. अंगणवाडी सेविकांना बालके, स्तनदा आणि गर्भवतींच्या संपर्कात यावे लागते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास जबाबदारी कोण घेणार?
- एम. ए. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती

अंगणवाडी सेविकांची संख्या 

  • २,८०० पुणे जिल्हा
  • सुमारे ३०० पुणे महापालिका
  • सुमारे २२५ पिंपरी-चिंचवड महापालिका

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com