सहकार क्षेत्रात तरुण आणि महिलांचा सहभाग वाढावा; अनिल कवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Kawade

सहकार क्षेत्रात तरुण आणि महिलांचा सहभाग वाढावा; अनिल कवडे

पुणे : सहकार चळवळीत समर्पण, पारदर्शकता आणि विश्वास हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात सहकारी चळवळीसमोरील आव्हानांचा अभ्यास करून तत्परतेने निर्णय घेतले जावेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात यावा. तसेच, बदलत्या काळानुसार तरुण आणि महिलांचा सहकार चळवळीत सहभाग वाढावा, असे आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ६९ व्या सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन सोमवारी सहकार आयुक्त कवडे यांच्या ऑनलाइन व्याख्यानाने झाले.

सहकार सप्ताहानिमित्त विविध विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, अनिल करंजकर, पद्माकर जेरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर, बँक प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. बँक्स असोसिएशनच्या आवारात सकाळी अध्यक्ष सुभाष मोहिते यांच्या हस्ते तर, सहकारी बँकांनी त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सहकार ध्वजवंदन करण्यात आले. कवडे म्हणाले, सहकार क्षेत्रातील चांगल्या गोष्टींपेक्षा एखादी अनुचित घटना घडल्यास त्याचा प्रचार-प्रसार फार वेगाने होतो, हे व्यवस्थेचे दुर्दैव आहे. तरुणाईकडे असलेल्या नवनवीन संकल्पनांचा उपयोग सहकार क्षेत्रात व्हावा.

राज्यातील सुमारे साडेचार ते पाच कोटी जनता सहकार क्षेत्राशी जोडली आहे. सहकार रुजविण्यासाठी महिलांचा आणि तरुणांचा सहभाग वाढायला हवा. समाजातील सर्व घटकांचा सहभाग असल्यास सहकार चळवळ अधिक भक्कम होईल. असोसिएशनचे अध्यक्ष मोहिते यांनी सहकार सप्ताहात करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन अनिल करंजकर यांनी केले. तर, आभार मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांनी मानले.

अवयव दानाचा प्रचार-प्रसार करावा

सहकार क्षेत्रातील मूल्ये जपताना अवयव दानाविषयी जनजागृती करण्यात यावी. संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद यांच्या माध्यमातून हा विचार पुढील पिढीपर्यंत पोचवावा, अशी अपेक्षा कवडे यांनी व्यक्त केली.