हवाबंद वाहनात ४५ जनावरे कोंबली; २१ जनावरांचा गुदमरून मृत्यू;पोळ्याच्या पार्श्वभूमीवर संतापजनक घटना;

हवाबंद वाहनात ४५ जनावरे कोंबली; २१ जनावरांचा गुदमरून मृत्यू;पोळ्याच्या पार्श्वभूमीवर संतापजनक घटना;
Published on

गुजरातहून कत्तलीसाठी आणलेल्‍या २१ जनावरांचा गुदमरून मृत्यू

हवाबंद वाहनात कोंबली ४५ जनावरे; पोळ्याच्या पार्श्वभूमीवर संतापजनक घटना

अक्कलकोट, ता. १० : कत्तलीसाठी घेऊन जाताना ४५ जनावरांना क्षमतेपेक्षा अधिक दाटीवाटीने बंद वाहनात कोंबण्यात आले होते. चारापाणी आणि पुरेशी हवा नसल्याने यातील तब्बल २१ जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुधनी-मैंदर्गी मार्गावर घडली. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.
दुधनी-मैंदर्गी मार्गावरील एका हॉटेलसमोर केए-३२ एए-८४३५ क्रमांकाचे टाटा मोटर्सचे बंद वाहन मंगळवारी (ता. ८) सकाळी उभे होते. संशय आल्याने गोरक्षकांनी डायल ११२ वर पोलिसांना माहिती दिली. मैंदर्गी दूरक्षेत्रातील पोलिसांनी घटनास्थळी पोचून वाहनाची तपासणी केली. वाहनाचा दरवाजा उघडल्यानंतर त्यात ३४ जर्सी, आठ खिलार आणि तीन गीर जातींची एकूण ४५ जनावरे दाटीवाटीने भरल्याचे आढळले. काही जनावरांच्या गळ्याला व पायांना दोर बांधले होते. या अमानुष वाहतुकीत २१ जनावरांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीत जनावरे गुजरातहून आणल्याचे समोर आले. त्यांच्याकडे वाहतुकीचा परवाना व वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे सांगण्यात आले. जनावरे कोठे नेली जात आहेत, याबाबत चालकांकडे चौकशी केली असता कत्तलीसाठी नेत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी चालक सय्यद इस्माईल गुलाम दस्तगीर (३१), मोहम्मद शबीर कसाब (२२), मोहम्मद हबीब मोहम्मद हुसेन शेख (२०), वाहनमालक हसन कुरेशी आणि जनावरांचा मालक आदिल कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ जनावरांना गोशाळेत सोडण्यात आले असून संबंधित वाहन ताब्यात घेतले आहे. मात्र, संशयितांना कायद्यानुसार नोटीस देऊन सोडण्यात आल्याने कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल नागनाथ कुंभार व मोहन पवार यांनी कारवाई केली.

पोळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या जीवांचा बळी
पोळा हा शेतकऱ्यांसाठी पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. अशा वेळी ४५ जनावरांना बंद वाहनात कोंबून त्यातील २१ जनावरांचा गुदमरून मृत्यू होणे ही घटना संतापजनक आहे. मुक्या जीवांच्या वाहतुकीबाबत नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com