esakal | अपार्टमेंटधारकांना आता क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स द्यावा लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

Apartment

अपार्टमेंटधारकांना आता क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स द्यावा लागणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - अपार्टमेंटधारकांकडून (Apartment) क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्क (मेंटेनन्स) (Maintenance) आकारण्यात यावे, असा आदेश सहकार उपनिबंधक (पुणे शहर-१) यांनी दिला आहे. अरण्येश्वर येथील ट्रेझर पार्क अपार्टमेंटबाबत हा निर्णय देण्यात आला आहे. (Apartment Owners will now have to Pay Maintenance According to the Area)

महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायद्यानुसार सभासदांकडून चौरस फूट आकारावर देखभाल शुल्क आकारणी करण्यात यावी. परंतु, त्याऐवजी ट्रेझर पार्क अपार्टमेंटमध्ये समान शुल्क आकारण्यात येत आहे. २०१९-२० मध्ये काही सभासदांनी महाराष्ट्र अपार्टमेंट कायद्यानुसार देखभाल खर्च भरला होता. परंतु सभासदांकडून समान देखभाल खर्चाच्या रकमेवर व्याज आकारणी करून वसुली केली आहे. त्यामुळे टू बीएचके फ्लॅटधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौरस फुटानुसार देखभाल शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी नीलम पाटील, प्रमोद गरड, अतुल इटकरकर, प्रवीण भालेराव, नरेंद्र चौधरी आणि संघर्ष समितीचे सदस्य विजय शिंदे यांनी उपनिबंधक यांच्याकडे केली होती.

हेही वाचा: पुणे : म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या जुलैमध्ये निम्म्याहून कमी

या संदर्भात ट्रेझर पार्क असोसिएशनने डिसेंबर २०२० मध्ये उपनिबंधक यांच्याकडे लेखी म्हणणे सादर केले आहे. त्यानुसार, ‘वार्षिक देखभाल शुल्क सर्वसाधारण वार्षिक सभेत ठरवले जाते. असोसिएशनला देखभाल शुल्क लावण्याचा अधिकार नाही. कोरोनामुळे यावर्षी वार्षिक सभा घेणे शक्य झाले नाही. परंतु, निर्दशनास आणून दिलेली सूचना वार्षिक सभेत मांडण्यात येईल.’

दरम्यान, उपनिबंधकांनी अपार्टमेंटच्या मेंटेनन्सबाबत दिलेला हा पहिलाच निर्णय आहे. त्यामुळे सर्व अपार्टमेंटमधील हजारो मध्यमवर्गीयांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

सुमारे १०,००० पुणे जिल्ह्यातील अपार्टमेंट

अपार्टमेंट कायद्यानुसार अपार्टमेंटधारकांना त्यांच्या क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्काची आकारणी करण्यात येते. परंतु, हा नियम सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांतील सभासदांना लागू असणार नाही. उपनिबंधक कार्यालयाकडून अपार्टमेंटधारकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जात आहे. तसेच, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशनही अपार्टमेंटचे प्रतिनिधित्व करीत आहे.

- सुहास पटवर्धन, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन

loading image