esakal | पुणे : म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या जुलैमध्ये निम्म्याहून कमी
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

पुणे : म्युकरमायकोसिस रुग्णसंख्या जुलैमध्ये निम्म्याहून कमी

sakal_logo
By
गजेंद्र बडे : सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर व जिल्ह्यातील म्युकरमायकोसीसच्या नवीन रुग्णांची संख्या जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात अगदी निम्म्याहून कमी झाली आहे. जुन महिन्यातील चार आठवड्यांमध्ये मिळून आठवड्याला सरासरी ९४ नवे रुग्ण आढळून होते. जुलै महिन्यातील आठवड्यातील नवीन रुग्णांची हीच संख्या केवळ ४२ इतकी झाली आहे. (the number of mucomycosis patients dropped to less than half in July in Pune aau85)

हेही वाचा: राज्याला दिलासा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट!

जिल्ह्यात जून महिन्यात म्युकरमायकोसिसचे एकूण ३७५ नवे रुग्ण आढळून आले होते. हीच संख्या जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात ४२ झाली आहे. यामुळे शहर व जिल्ह्यातील म्यकुरमायकोसिस रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांबरोबरच म्युकरमायकोसिसचे रुग्णही आढळून येऊ लागले होते. हे रुग्ण आढळून येण्यास एप्रिल २०२१ मध्ये सुरुवात झाली होती.

हेही वाचा: आमदार नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी भूमिका स्पष्ट करावी - राज्य सरकार

आजअखेरपर्यंत पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण १ हजार २३८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील असलेले परंतु पुणे शहरात उपचार घेत असलेल्या ४५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या वगळता उर्वरित १ हजार १९३ रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. यांपैकी सर्वाधिक ४२१ रुग्ण हे मे महिन्यात आढळून आले होते. जून महिन्यात काहीशा प्रमाणात नवीन रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर आता जुलैमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: राज्याला दिलासा, कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट!

दरम्यान, आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील ६०७ रुग्णांनी म्युकरमायकोसिसवर मात केली असून अन्य ४५९ रुग्णांवर शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४९३, पिंपरी चिंचवडमधील २८४ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६९ रुग्णांचा समावेश आहे. अन्य विविध भागातील मिळून ३९२ रुग्ण हे ससून रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत.

जिल्ह्यातील महिनानिहाय रुग्ण संख्या (कंसात महिनानिहाय झालेले मृत्यू)

  • एप्रिल २०२१ --- ३५५ (२७)

  • मे २०२१ --- ४२१ (३३)

  • जून २०२१ --- ३७५ (८१)

  • जुलै २०२१ (७ जुलैपर्यंत) --- ४२ (०२)

  • पुणे जिल्हा एकूण --- ११९३ (१४३)

  • जिल्ह्याबाहेरील --- ४५ (२९)

  • एकूण ---- १२३८ (१७२)

loading image