लॉकडॉऊनच्या निर्बंधांमुळे शेकडो ‘अरंगेत्रम’ रखडले!

सभागृहांना टाळे असल्याने भरतनाट्यम नर्तकांचा खोळंबा
pune
punesakal

पुणे : भरतनाट्यम नृत्यशैलीचे औपचारिक शिक्षण पूर्ण करून नर्तकांना पुढील वाटचाल सुरु करण्यातील महत्वाचा टप्पा असणारे ‘अरंगेत्रम’ गेली दोन वर्षे होऊ शकलेले नाहीत. कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर निर्बंध असल्याने शेकडो ‘अरंगेत्रम’ रखडले आहेत. रंगमंचावरील प्रत्यक्ष कलेचे सादरीकरण, हा यातील महत्वाचा भाग असल्याने ऑनलाईन सादरीकरणाचे पर्याय फारसे स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा होत असल्या तरी देखील ‘अरंगेत्रम’ अभावी नर्तकांचा खोळंबा झाला आहे.

सार्वजनिक सभागृहांवर गेली दोन वर्षे निर्बंध असल्यामुळे प्रत्यक्ष सादरीकरण थांबले आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या काही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र प्रत्यक्ष सादरीकरणात लागणारा कस ऑनलाईन सादरीकरणात लागत नाही. तसेच इंटरनेटच्या रेंजचे अडथळेही असल्याने तीन तासांचे सादरीकरण आभासी पद्धतीने पाहायला प्रेक्षकही उत्सुक नाहीत. त्यामुळे ‘अरंगेत्रम’चे मूळ उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे नृत्यादर्पण अकादमीच्या संचालक व भरतनाट्यम नृत्यांगना प्रज्ञा अत्रे यांनी सांगितले.

भरतनाट्यम नृत्याचे किमान ७ वर्षे पूर्ण झाल्यावर आणि संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नर्तक अरंगेत्रम करण्यास पात्र ठरतो. नृत्याच्या अभ्यासक्रमात हा महत्त्वाचा टप्पा समजला जातो. शहरातील अनेक नृत्यवर्गांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या सुमारे शेकडो नर्तकांचा यामुळे खोळंबा झाला आहे. “२२ ऑक्टोबरपासून नाट्यगृहे सुरु करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र रसिक पुन्हा लगेच किती संख्येने नाट्यगृहात येतील याबाबत शंका आहे. त्यामुळे पुढील नियोजन आम्ही अद्याप केलेले नाही”, अशी माहिती नृत्य भक्ती फाउंडेशनच्या संचालक आणि भरतनाट्यम नृत्यांगना सई परांजपे यांनी दिली.

pune
खडकवासला पाटबंधारे विभागात पन्नास टक्के पदे रिक्त

‘अरंगेत्रम’ म्हणजे काय?

भरतनाट्यमचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरूंची अनुमती घेऊन ‘अरंगेत्रम’चे सादरीकरण केले जाते. रसिक प्रेक्षकांसमोर आणि वादक व गायकांच्या साथीने रंगमंचावर संबंधित नर्तक अथवा नर्तकी एकल नृत्यप्रस्तुती करतात. संबधित नर्तकाच्या सर्व प्रकारच्या कौशल्याचा आणि तयारीचा यात कस लागतो. ‘अरंगेत्रम’ नंतर गुरू आपल्या शिष्यास स्वतंत्र सादरीकरणाची परवानगी देतात. हौसेपलीकडे गंभीरतेने या नृत्यप्रकाराकडे बघणाऱ्या नर्तक-नर्तकींसाठी हा महत्वाचा टप्पा असतो.

“२०२० च्या डिसेंबर महिन्यात मी ‘अरंगेत्रम’ करण्याचे ठरवले होते. सगळी तयारीही पूर्ण केली होती. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे ‘अरंगेत्रम’ करता आले नाही. नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने सुरु होण्याबाबत अनिश्चतता असल्याने ‘अरंगेत्रम’ कधी करायचं, याबाबत काही ठरवलेले नाही.”

– जान्हवी कशाळीकर, विद्यार्थिनी ,

नृत्यांजली भरतनाट्यम अकादमी, पुणे.

“२०२१ मध्ये मी ‘अरंगेत्रम’ करण्याचे नियोजन केले होते. पण निर्बंधांमुळे प्रत्यक्ष गुरूंकडे जाऊन सराव करण्यावर मर्यादा येत होत्या. ऑनलाईन सरावातून पुरेशी तयारी होत नाही. त्यामुळे मी नियोजन पुढे ढकलले आहे.”

– ईश्वरी मराठे, विद्यार्थिनी,

नृत्यदर्पण भरतनाट्यम अकादमी, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com