esakal | खडकवासला पाटबंधारे विभागात पन्नास टक्के पदे रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

खडकवासला पाटबंधारे विभागात पन्नास टक्के पदे रिक्त

खडकवासला पाटबंधारे विभागात पन्नास टक्के पदे रिक्त

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: शंभर टक्के धरणं भरलेली असताना खडकवासला पाटबंधारे विभागात मागील काही वर्षांपासून सरासरी सुमारे पन्नास टक्के पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर खडकवासला पाटबंधारे विभागाचा कारभार सुरू आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील तब्बल सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, पानशेत व वरसगाव ही धरणे आणि खडकवासला धरणापासून लोणी काळभोर पर्यंत पंचेचाळीस किलोमीटर कालवा यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत खडकवासला, पानशेत व वरसगाव ही तीनही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. असे असताना मागील काही वर्षांपासून कर्मचारी भरती होत नसल्याने एकूण ३५४ मंजूर पदांपैकी तब्बल १७२ पदे रिक्त आहेत. परिणामी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: भारत ताकदीनिशी कोरोनाच्या संकटाशी लढला - PM मोदी

पदाचे नाव/मंजूर पदसंख्या/भरलेली पदसंख्या/रिक्त पदसंख्या.......

प्रथम लिपिक/१/१/०

सहाय्यक आरेखक/१/१/०

भांडारपाल/१/१/०

स्थापत्य अभियंता सहाय्यक/२७/२५/२

वरिष्ठ लिपिक/१४/१३/१

वरिष्ठ दफ्तर कारकून/१/०/१

अनुरेखक/१०/६/४

संदेशक/१५/७/८

कनिष्ठ लिपिक/३४/२६/८

वाहन चालक/१०/४/६

सहाय्यक भांडारपाल/१/१/०

दफ्तर कारकून/५५/४५/१०

मोजणीदार/६४/१६/४८

कालवा निरीक्षक/१२०/३६/८४

एकूण/३५४/१८२/१७२

हेही वाचा: भारतीयांची सरासरी उंची घटलीय, संशोधनातून समोर आलं वास्तव

२००९ पासून अनुकंपा यादीतील उमेदवार प्रतिक्षेत......

२००९ सालापासून अनुकंपा तत्वानुसार नोकरभरती न झाल्याने शेकडो उमेदवार प्रतिक्षा यादीत भरतीची प्रतिक्षा करत आहेत. सदर यादीतील अनेक उमेदवार वयाची पंचेचाळीस वर्षे पूर्ण झाल्याने नोकरी न लागताच अपात्र ठरले आहेत व काही अपात्र होण्याच्या जवळ आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्वानुसार भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी या उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

" सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी पदे रिक्त आहेत. भरती प्रक्रिया ही शासन स्तरावरुन राबवली जाते. सरळसेवा किंवा अनुकंपा तत्वानुसार भरती प्रक्रीयेबाबत सद्यस्थितीत काहीही सांगता येत नाही." विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग.

loading image
go to top