कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता.11) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 

संपूर्ण राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. दरम्यान, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. कोकण-गोव्यात मुरबाड, शहापूर, वाडा, खालापूर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली; तर मध्य महाराष्ट्रात लोणावळा, महाबळेश्‍वर, इगतपुरी, राधानगरी, वडगाव मावळ, मुळशी अशा विविध ठिकाणी पाऊस झाला. विदर्भालाही पावसाने झोडपले असून, नागपूर, हिंगणा, रामटेक, चिमूर, हिंगणघाट, उमरेड यांसह अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकणासह विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला; तर मराठवाड्यात मध्यम पावसाची नोंद झाली. 

वायव्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्राकार वाऱ्याचा प्रभाव वाढत आहे. परिणामी, पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. राज्यासह मध्य भारत आणि दक्षिणकडील राज्यांमध्ये धुवाधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The area of low pressure will increase the rains