निवासाची व्यवस्था करा, मगच कंपन्या सुरू करा

निवासाची व्यवस्था करा, मगच कंपन्या सुरू करा

पिंपरी - उद्योगाची थांबलेली चाके सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील चाकण, तळेगाव, रांजणगाव व नगर रोड या ग्रामीण भागातील उद्योगांना कामकाज सुरू करायचे असेल, तर कंपन्यांच्या परिसरातच कमीत कमी कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. कंपन्यांपासून शंभर मीटरच्या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामासाठी जाता येणार आहे, असे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले. 

ग्रामीण भागातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्याआधी कंपनीत किती कर्मचारी काम करतील, याची तपशीलवार माहिती उद्योग विभागाला देणे सक्तीचे आहे. तसेच, कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले. उद्योगांना प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. मात्र, कंपन्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षेच्या सर्व खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्यात कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हातात ग्लोजचा वापर करणे, वारंवार हात धुणे, परिसर स्वच्छ ठेवणे आदी खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे सुरवसे यांनी सांगितले. 

...तर होणार कारवाई 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे दोन्ही शहर रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे या भागातील कारखानदारांना कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येणार नाही. तसे आढळल्यास संबंधित उद्योगावर कारवाई करण्यात येईल, असे सदाशिव सुरवसे यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यातील उद्योगांची संख्या 
सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग - दोन लाख ३४ हजार 
मोठे उद्योग - ८३४ 
एकूण कर्मचारी - १२ लाख 

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com