esakal | रेमडेसिव्हिर उपलब्ध केले तर बिघडले कोठे? चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

corona Vaccination center

रेमडेसिव्हिर उपलब्ध केले तर बिघडले कोठे? चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
जितेंद्र मैड

कोथरुड: पुण्यात लोकांची इंजेक्शनसाठी धावपळ सुरु आहे आणि लोकांना एकही रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन मिळत नाही. अशा परीस्थितीत आम्ही इंजेक्शनची व्यवस्था केली तर बिघडले कोठे. सरकारची यंत्रणा कागदावर आहे.. इंजेक्शन वाटले तर काय चुकले. लोकांना इंजेक्शन हवे आहे.. तुम्हाला वाटता येत असेल तर वाटा. भाजपाचे कार्यकर्ते घरदार विकून सामाजिक काम करतात. हा काय गुन्हा आहे काय, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारच्या कारभारावर कोरडे ओढले.

पंडीत दीनदयाळ शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन करायला आलेल्या चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, पोलिसांवर आमचा काहीही दबाव नाही. मात्र निरपराध माणसांना उचलून नेणे सहन करणार नाही. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांइतकेच अधिकार आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात दिवसभरात ११६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

देशात आणिबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचे राऊत म्हणताहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते या पत्रकाराच्या प्रश्नावर बोलताना मिश्किलपणे पाटील म्हणाले की,  पवारांवर पीएचडी, अजित पवारांवर एमफील आणि राऊतांवर पुस्तक लिहीतोय. राऊत म्हणजे वर्णन करण्यापलिकडचे आहेत. लसीकरणामध्ये टप्पे ठरले आहेत. त्यानुसार प्रत्येक राज्याला लस मिळत आहे. खोटा प्रचार केला जात आहे. महाराष्ट्राला सर्वात जास्त लस मिळत आहे. लसीचा काळाबाजार चालला असल्याचे माझे मत आहे. टप्प्याटप्प्याने लस देण्यात यावी. पुण्यात सहा लाख लसीकरण झाले आहे. अजून चौदा लाख लसीकरण झाले की पंचेचाळीस वयाखालील नागरीकांना लसीकरण करावे.

भाजपाच्यावतीने पुण्यात कोरोना संदर्भात कोणत्या उपाय योजना चालू आहेत याची माहिती देताना पाटील म्हणाले की, लसीकरणामुळे कोरोना कमी होईल असे आम्हाला वाटते. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढविण्याचा भाजपाचा प्रयत्न राहील. भाजपाची प्रत्येक मतदार संघात ६० शक्ती केंद्र आहेत. पुण्यातील आठ मतदारसंघात असलेल्या ४८० शक्ती केंद्रांना सांगितले आहे की, सोसायटीच्या आत न जाता जे कोरोना बाधीत असल्याचा संशय असलेल्यांचा शोध घेण्यात येईल. त्यांची चाचणी केली जाईल. गरीब असेल तर त्याचा खर्च पक्ष करेल. हा रुग्ण पॉझीटीव्ह नीघाला परंतु त्यात लक्षणे दिसत नसतील व तो जर घरी राहणार असेल तर त्याला टेलीमेडीसीन देण्यात येईल. सिध्द झालेली दोन आयुर्वेदीक औषधे व औषधोपचाराचे कीट त्यांना देण्यात येईल. लक्षणे नसलेल्या व घरी राहू न शकणा-यांना संघाने सुरु केलेल्या कर्वेनगर मधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. ते आता पुर्ण क्षमतेने भरले असल्याने एसएनडीटी येथे नवीन केंद्र सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. ज्यांना लक्षणे दिसतात व त्रास होतोय अशासाठी २८० बेडची व्यवस्था कोथरुडमधील रुग्णालयांमध्ये केली आहे. त्यामध्ये संजीवनीमध्ये ४०, दिनदयाळ रुग्णालयात ६०, ऑरेंज रुग्णालयात १०० केली आहे. पीपीई कीट घालून कार्यकर्त्यांनी मतदारसंघात कोरोना कार्यासाठी जावे असे सांगण्यात आले आहे.

भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुध्दे, दिपक पोटे, जयंत भावे, पुनीत जोशी, हर्षदा फरांदे, भाजपाचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.