esakal | कोरोना काळात विकसित झाला लोकसहभागातून बारामती पॅटर्न
sakal

बोलून बातमी शोधा

corona baramati

कोरोना काळात विकसित झाला लोकसहभागाचा बारामती पॅटर्न...

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी एकीकडे प्रशासन स्तरावर उपाययोजना सुरु असताना बारामतीत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने लोकसहभागातून मोठे काम उभे राहिले आहे. हा बारामती पॅटर्न राज्यभर राबविला तर कोरोना रुग्णांना निश्चित दिलासा मिळू शकतो. संकटात बारामतीकर एक होतात आणि त्या संकटाला एकदिलाने सामोरे जातात हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. बारामतीत गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यानंतर लक्षणे नसलेल्या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी कोविड केअर सेंटरची गरज भासणार होती. शासकीय स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात शासनस्तरावर कोविड केअर सेंटर सुरु झाले. चारच दिवसांत त्याची क्षमता सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी लोकसहभागातून कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा: Maharashtra Board Exam 2022 : विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही ‘परीक्षा’

यात नटराज नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून किरण गुजर व त्यांचे सहकारी तसेच काही सहकारी नगरसेवक हे पुढे आले. नटराजच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात पहिले कोविड केअर सेंटर सुरु झाले. खरतर हे सेंटर सुरु करताना आणखी काही सेंटर सुरु करावी लागतील अशी कोणाला कल्पनाही नव्हती. आज बारामती शहरात तारांगण, अहिल्यादेवी होळकर वसतिगृह, टीसी महाविद्यालय तसेच विद्या प्रतिष्ठानच्या वसतिगृहात तसेच माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या वसतिगृहासह लोकसहभागातून तब्बल 1525 खाटांची व्यवस्था उभारुन बारामतीकरांना दिलासा देण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: कोरोनाबाधित कुटुंबाची हतबलता; रेमडेसिव्हिर आणणार कोण?

काही शासकीय व काही लोकसहभागातून मदत करून आज लक्षणे नसलेल्या 1075 रुग्णांना ही व्यवस्था दिलासा देत आहे. ज्यांच्या घरी स्वतंत्र खोली व स्वच्छतागृहांची सुविधा नाही, अशा लोकांना हा विनामूल्य दिलासा मिळाला आहे. या साठी काही जणांनी पाण्याचे जार दिले, काहींनी दररोज अंडी पुरवण्याचे काम हाती घेतले आहे तर एका बेकरी व्यावसायिकाने बिस्कीट पुरवण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने आता बारामतीकरांसाठी लवकरच एक हेल्पलाईन सुरु करणार असल्याचे किरण गुजर यांनी आज सांगितले. दरम्यान आता मुंबईतील एका एजन्सीने खाजगी तत्त्वावर हॉटेल भाडेतत्त्वावर घेऊन तेथेही कोविड रुग्णांची सुविधा करण्याचाही प्रस्ताव दिला आहे, असेही गुजर म्हणाले. दुसरीकडे शारदा प्रांगण येथेच लसीकरण केंद्रही सुरु करण्यात आले असून त्याचाही लोकांना फायदा होतो आहे.