मालिकेत संधीच्या बहाण्याने फसवणूक ; आरोपी अटकेत

पांडूरंग सरोदे
शनिवार, 15 जून 2019

- खासगी दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याच्या बहान्याने फसवणूक
-  एका व्यावासायिकाची 55 हजार रुपयांची फसवणूक
- आरोपीस पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

पुणे  : खासगी दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याच्या बहान्याने एका व्यावासायिकाची 55 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

सौरव महेश श्रीवास (वय 34), वैभव महेश श्रीवास (वय 25, जीवजीगंज,मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यावसायिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक असून ते कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहण्यास आहेत. त्यांची बारा वर्षाच्या मुलीला बालकलाकार म्हणून दूरचित्रवाणी मालिका, चित्रपटांमध्ये काम करायचे होते. दरम्यान, व्यावयिकास खासगी दूरचित्रवाणीमध्ये एका मालिकेसाठी बालकलाकारांना संधी असल्याची जाहीरात त्यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी संबंधीत मोबाईल क्रमांकावरुन वैभव महेश, जयंतसिंग तोमर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने व्यावसायिकाने आरोपींच्या खात्यात 55 हजार रूपये जमा केले. त्यानंतर त्यांनी तोमर आणि महेश यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडुन करण्यात आला. त्यावेळी मोबाइल लोकेशनवरुन आरोपी शिर्डी येथे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे, पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण औटी यांच्या पथकाने दोघाना शिर्डी येथून अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrest to cheaters for cheating by offering role of child actor role in the serial