esakal | प्रवाशांना लुटणारी टोळी प्रवाशाच्या हुशारीमुळे जेरबंद 
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दौंड तालुक्यातील पडवी- सुपे घाटात रात्रीच्या वेळी दुचाकी अडवून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. या टोळीने लुटलेल्या एका प्रवाशाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित टोळी जेरबंद करण्यात यवत (ता. दौंड) पोलिसांना यश आले. 

प्रवाशांना लुटणारी टोळी प्रवाशाच्या हुशारीमुळे जेरबंद 

sakal_logo
By
अमर परदेशी

वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील पडवी- सुपे घाटात रात्रीच्या वेळी दुचाकी अडवून प्रवाशांची लूटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. या टोळीने लुटलेल्या एका प्रवाशाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित टोळी जेरबंद करण्यात यवत (ता. दौंड) पोलिसांना यश आले. 

सुप्यावरून चौफुला दिशेला जाणाऱ्या एका व्यक्तीला दुचाकीवरून बसून पडवी घाटात आणून लुटल्याचा प्रकार मागील महिन्यात घडला होता. याबाबत लिंगादेव निवृत्ती पांढरे (रा. शिरूर) यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी सागर ऊर्फ सोन्या जालिंदर सूर्यवंशी, महादेव रामा जाधव (दोघेही रा. वरवंड, ता. दौंड) व सागर अरुण टिळेकर (रा. पडवी) यांना अटक केली आहे. 

याबाबत यवतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी माहिती दिली की, फिर्यादी लिंगादेव पांढरे हे 30 जूनला पंढरपूरला गावी गेले होते. त्यानंतर ते 4 जुलै रोजी बारामती मार्गे मोरगावला आले. तेथून शिरूरला जाण्यासाठी ते ट्रकने सुपे (ता. बारामती) येथे आले. त्या वेळी रात्रीचे नऊ वाजता ते सुपे- चौफुला मार्गावर उभे असताना एक आरोपी पल्सर मोटारसायकल घेऊन तेथे आला आणि तुम्हाला चौफुला येथे जायचे आहे का? असे विचारले. त्या वेळी फिर्यादी पांढरे हे त्याच्या दुचाकीवर बसले. मात्र, मोटारसायकलस्वाराने पडवी येथे घाटात आल्यानंतर लघुशंकेचे कारण सांगून दुचाकी थांबविली. त्या वेळी दोन जण त्याठिकाणी आले आणि तिघांनी मिळून पांढरे यांना मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व एटीएम कार्ड काढून घेतले आणि सक्तीने एटीएमचा पिन नंबर घेतला. तसेच, पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पांढरे यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. 

दरम्यान, पांढरे हे एक महिन्यानंतर शुक्रवारी (ता. 23) शिरूरवरून गावी जाण्यासाठी चौफुला येथे आले. त्या वेळी त्यांना एका ठिकाणी संबंधित पल्सर मोटारसायकल व आरोपी दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन दोन आरोपींना पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपासणी केली असता एका आरोपीच्या खिशात फिर्यादीचा चोरी गेलेला मोबाईल सापडला.

या प्रकरणी पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. तीनही आरोपींना मंगळवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडी मिळाली आहे. 

loading image
go to top