Video : घरभर दरवळतोय कलेचा गंध...

नीला शर्मा 
Thursday, 2 April 2020

कार्यमग्न राहणारी अनेक माणसं आपल्या जवळपास असतात. काही तरी अनोखं काम करण्यात रमणं ही कला तर आहेच, पण फार मोठी शक्तीही असते. सहजच बरेच काही करणाऱ्या अशाच काही लहानथोरांनी अनुभवलेले ‘बहराचे क्षण’ अनुभवू आजपासून....

कार्यमग्न राहणारी अनेक माणसं आपल्या जवळपास असतात. काही तरी अनोखं काम करण्यात रमणं ही कला तर आहेच, पण फार मोठी शक्तीही असते. सहजच बरेच काही करणाऱ्या अशाच काही लहानथोरांनी अनुभवलेले ‘बहराचे क्षण’ अनुभवू आजपासून....

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दीप्ती विसपुते ही शिल्पकार तरुणी आणि देवेंद्र भागवत हा चित्रकार, हे जोडपं घरातूनच आपापलं व्यावसायिक काम करतात. छंदाचं रूपांतर व्यवसायात करणं हे तसं फार कस पाहणार. या दोघांनी नेटानं आपल्या कलात्मक व्यवसायाबरोबर संगीताचा छंदही जोपासला आहे. त्यांची चार वर्षांची लेक मनवा ही कलेचं बाळकडू मिळाल्याने रोज तिला सुचतील तशा नव्या कलाकृती घडवते. त्यांच घर जणू एक जादूची गुफाच आहे. 

दीप्ती मातीपासून उत्तमोत्तम शिल्पाकृती घडवते. मातीशी हातांनी होणाऱ्या संवादात रमते. बच्चेकंपनीला मातीची ही नवलाई समजावण्याच्या ओढीने ती कार्यशाळा घेते. यासाठी तिचा खास स्टुडिओ आहे. तिथेच ती आईच्या हातातली जादू बघत आली. तोडी मोठी होताच तीही मातीत हात घालू लागली. मातीचा गोळा हातात घेऊन, त्यापासून काही करून पाहणं सततच झालं. जे काही तयार होईल, त्याला मग बाबांकडचे रंग घेऊन रूप देणं ओघाने आलंच. 

या विषयी देवेंद्र म्हणाला, ‘‘मनवाला रंग, ब्रश असा तिचा संच आणून दिला.  मी जेंबे वाजवतो, तेव्हा ती तिच्या खेळण्यातली गिटार घेऊन साथ देण्याचा प्रयत्न करते. दीप्तीच्या स्टुडिओत पहिल्यांदा चाकावर काम करताना माझ्या मनात साशंकता होती की, हे मला जमेल का? पण मनवाने अलीकडेच एके दिवशी चाकावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. दीप्ती आणि मी जरा गडबडलो, पण मनवाने सहज बाउल बनवला.’’

दीप्तीने सांगितलं की, तिने आतापर्यंत बऱ्याच वस्तू बनवल्या आहेत. माझ्या कलाकृती भट्टीत भाजताना मनवाने तयार केलेली खेळणीही भाजते. नंतर तिला हव्या असल्यास ती त्यावर रंग देते. देवेंद्र म्हणाला, ‘‘दीप्ती गाते, सतार वाजवते. मनवाला त्यात सहभागी व्हायला आवडतं. दीप्ती बालगोपाळांसाठी गंमतशीर खेळणी तयार करायला शिकवणारे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर टाकते. मनवा बोलते आणि वस्तू करून दाखवते.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Craftsman dipti vispute