Video : हत्तींना आपला वाटणारा माणूस

हत्तीच्या पिलाबरोबर मस्ती करताना आनंद शिंदे.
हत्तीच्या पिलाबरोबर मस्ती करताना आनंद शिंदे.

हत्तींशी गप्पा मारत, ते काय सांगू पाहत आहेत याचा अंदाज आनंद शिंदे बांधू शकतात. त्यांनी हत्तींबाबत केलेल्या अभ्यासाची दखल आज मोठ्या प्रमाणावर घेतली जाते आहे. हत्तींच्या पिलांशी चालणारा त्यांचा संवाद अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हत्तींशी संवाद साधणारा माणूस म्हणून आनंद शिंदे यांना आज ओळखलं जातं. ते म्हणाले, ‘‘आठ वर्षांपूर्वी एलिफंट या शब्दाचं स्पेलिंग व हत्तीचा आकार यापलीकडे मला काही माहीत नव्हतं; पण सात वर्षांपूर्वी हत्तींच्या मी केलेल्या अभ्यासाला संशोधनाचा दर्जा प्राप्त झाला. हे नवल कसं घडलं? मी छायाचित्रकार या नात्याने हत्तींवर आधारित छायाचित्र प्रकल्प करत होतो. त्या दरम्यान वारंवार बारकाईने फोटो पाहताना हत्तींची देहबोली लक्षात येऊ लागली. कोचीपासून काही तासांच्या अंतरावरील हत्तींच्या केंद्रात वावरलो. पिलू हत्ती वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात, हे जाणवलं. कळत-नकळत मी त्यांच्याशी संवाद साधायच्या प्रयत्नात त्या आवाजांची नक्कल करू लागलो.

हळूहळू पिलांनी मला स्वीकारलं आणि लवकरच मी त्यांचा खेळगडी झालो. मग माझा यात सखोल अभ्यास सुरू झाला. डॉ. जेकब अलेक्‍झांडर यांच्या अभ्यासातून कळलं, की हत्ती विशेषतः मादी ही संवादासाठी दहा तऱ्हेचे आवाज काढते. नर जमिनीवर पाय आपटून निर्माण होणाऱ्या कंपनांद्वारे संदेश देतात. पिलं निरनिराळ्या मनोवस्थेनुसार वेगवेगळे आवाज काढतात. जॉइस पुली या अभ्यासकाने हे संवादप्रकार ध्वनिमुद्रित केले आहेत. माहितीच्या या खजिन्याआधारे मी घशातून तसे आवाज काढून हत्तींशी बोलू लागलो. आईपासून वेगळ्या झालेल्या, पायाचं हाड मोडलेल्या कृष्णाशी आणि त्याची काळजी घेणारी गंगा, या पिलांशी मनमुराद गप्पांची शिदोरी गाठीशी आहे.’’

शिंदे यांनी असंही सांगितलं, की लॉरेन्स अँथनी हा जगातला पहिला ‘एलिफंट व्हिस्परर.’ त्याचबरोबर डग्लस हॅमिल्टन आणि डॉ. डेफनी शॅल्ड्रिक या सगळ्यांनी जमवलेल्या माहितीचा मला फार उपयोग झाला. हत्तींसाठी नैसर्गिक वातावरण पुरवणाऱ्या कृत्रिम अधिवासांना ‘बोमा’ असं म्हणतात. जंगलात वाट चुकलेली किंवा जायबंदी अवस्थेत सापडलेली पिलं इथं सांभाळली जातात. त्यांना आईपासून दुरावल्याने बसलेल्या धक्‍क्‍यातून सावरायला मदत करणं, त्यांच्यात जीवनेच्छा जागवणं हे अशा केंद्रात मोठं आव्हान होऊन बसतं. निरनिराळ्या ध्वनींच्या माध्यमातून ते भावभावना व्यक्त करतात.

त्या समजून घेऊन अनेक ठिकाणच्या हत्तींना काय म्हणायचं आहे, हे तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भाषांतरित करून सांगण्यासाठी सेवा देत आलो आहे. सहा वर्षांपूर्वी ‘ट्रंक कॉल : द वाइल्ड लाइफ फाउंडेशन’ची स्थापना केली आणि हत्तींच्या संरक्षणासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती, अभ्यास, याचबरोबर इतर भटक्‍या प्राण्यांसाठी काम करतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com