Video : गडांबद्दल प्रेम असावं तर 'या' परदेशी मावळ्यासारखं...

हर्षदा कोतवाल
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

परदेशातील एखादा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, हे समजल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केली. 

पुणे- बेल्जियममधील एक अभियंता गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील किल्ल्यांवर जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजून घेत आहे. आत्तापर्यंत त्याने १७२ किल्ल्यांवर जाऊन, तेथील पराक्रमाची यशोगाथा समजून घेतली आहे. शिवरायांचा पराक्रम, त्यांची राज्यकारभाराची पद्धत आणि रयतेविषयीची आपुलकी या गुणांनी आपल्यावर गारूड केल्याचे तो आवर्जून सांगतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on

पीटर गेट असे त्यांचे नाव असून, किमान दोनशे किल्ल्यांवर जाऊन, आपल्याला छत्रपतींविषयी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करायचा आहे, असे ते आवर्जून सांगतात. पीटर हे बेल्जियममधील कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. एका कामासाठी ते चेन्नईत आले. भारतातील निसर्गसौंदर्यांची त्यांच्यावर मोहिनी पडली आणि येथेच स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने पीटर भारावून गेले आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळावी, तसेच कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील २०० किल्ल्यांवर जाण्याचे पीटरने ठरवले आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. बरं हे सर्व करण्यासाठी फार खर्च येणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. पाठीवर सॅक, त्यामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू, छोटासा तंबू आणि दुचाकी घेऊन, ‘विंचवाचा संसार पाठीवर’ याप्रमाणे त्यांची भटकंती सुरू आहे.

हॉटेलमध्ये न राहता, कोणाच्याही घरी ते राहतात. तीही सोय झाली नाही तर तंबू आहेच. तसेच पॅकबंद प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही ते टाळतात. आपल्यामुळे गडांवर प्लॅस्टिक नको, ही त्याच्यामागील भूमिका आहे.  

पीटर हे मूळचा धावपटू असल्याने त्यांचा फिटनेस प्रचंड आहे. व्हिएतनाम, श्रीलंका येथील मॅरेथॉनमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. त्याच्या जोरावरच त्यांनी एका दिवसात आठ किल्ले सर करायचीही किमया साधली आहे.

''परदेशातील एखादा माणूस महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे म्हटल्यावर महाराष्ट्रातील लोकांना त्याचं फार कौतुक वाटतं आणि म्हणूनच त्यांनी मला प्रत्येकवेळी मनापासून मदत केली आहे.''

महाराष्ट्रातील माणसं अगदी प्रेमळ आणि अगत्यशील आहेत, असं ते आवर्जून सांगतात. अतिथीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना दिसून येते. कोणाच्याही घरी राहिलो, तर सकाळी भरपेट नाश्‍ता केल्याशिवाय ते सोडणारच नाहीत, असं सांगत यजमानांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी सांगण्यात ते रंगून जातात. महाराष्ट्रात राहून, आपल्याला पिठलं भाकरी आवडायला लागली आहे, असंही ते कौतुकाने सांगतात. तसेच आवडता किल्ला कोणता, असं विचारल्यावर नगरमधील रतनगडाचे कौतुक करताना ते अजिबात थकत नाही.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Peter Van Geit (@petervangeit) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on Peter geit conquering 172 forts in Maharashtra