विधायक बदलांच्या दिशेने

रमेश डोईफोडे
Sunday, 6 September 2020

पुण्याचा गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचा आनंद लुटण्यासाठी राज्य-परराज्यांतून असंख्य लोक पुण्यनगरीत येतात. कोरोनामुळे यंदा उत्सवी स्वरूप कोठे दिसले नाही. वैभवशाली मिरवणुका, भव्यदिव्य देखावे-सजावट हे सर्व बाजूला ठेवून यावेळी मंडळांना साधेपणा जपावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच भाविकांचाही हिरमोड झाला असला तरी संकटकाळात परंपरागत उत्सव संतुलितपणे कसा साजरा करावा, याचा अनोखा आदर्श मंडळांनी घालून दिला आहे.

पुण्याचा गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचा आनंद लुटण्यासाठी राज्य-परराज्यांतून असंख्य लोक पुण्यनगरीत येतात. कोरोनामुळे यंदा उत्सवी स्वरूप कोठे दिसले नाही. वैभवशाली मिरवणुका, भव्यदिव्य देखावे-सजावट हे सर्व बाजूला ठेवून यावेळी मंडळांना साधेपणा जपावा लागला. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबरच भाविकांचाही हिरमोड झाला असला तरी संकटकाळात परंपरागत उत्सव संतुलितपणे कसा साजरा करावा, याचा अनोखा आदर्श मंडळांनी घालून दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गणेशोत्सवानिमित्त होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल, पथारीवाल्यांपासून असंख्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे अर्थार्जन, मंडळांना त्यांच्या आश्रयदात्यांकडून मिळणारे लाखोंचे प्रायोजकत्व, त्यातून अनेकविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी उपलब्ध होणारा निधी-स्वयंसेवी संस्था, गरजू व्यक्ती यांना केली जाणारी सर्वतोपरी मदत, मंडळाच्या कामातून आकाराला येणारे कार्यकर्ते-भविष्यातील नेते, सर्वधर्मीय ऐक्‍य आणि संस्कृती यांची प्रचिती... 

मास्क न घालणाऱ्या बहाद्दरांनो, आता पोलिस तुम्हाला लस टोचणार पण दंडाची!

उत्सवाच्या विधायकतेला पुष्टी देणाऱ्या अशा असंख्य बाबी आहेत. हे सर्व असूनही उत्सवाला अलीकडे जे वेगळे स्वरूप आले आहे, त्याबद्दल नाराजीचा सूरही आहे. तो यंदा अजिबात ऐकायला मिळाला नाही. यावर्षी जो काही बदल झाला, तो अनुसरण्यासारखा आहे, असे अनेकांना वाटते. एखाद्या आपत्तीत कधी काही चांगल्या गोष्टीही घडतात, त्यामुळे त्यांना ‘इष्टापत्ती’ असे म्हटले जाते. ‘कोरोना’ हा भयावह आहे; पण त्याने वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, शिष्टाचार यांत मोठे व चांगले बदल घडले. जे सर्वसाधारण परिस्थितीत केवळ प्रबोधनाने झाले नसते.

मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देणारे दोन ध्येयवेडे शिक्षक...

उत्सव नातेवाइकांकडे!
कोणताही सण हा सामूहिक आनंदाचा भाग असतो. स्वतः उत्सव साजरा करताना आपल्याबरोबर इतरांनाही त्या सौख्याची अनुभूती यायला हवी. किमान आपल्या अतिउत्साहामुळे इतरांचा रसभंग होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे; पण असे होतेच असे नाही. ध्वनिवर्धकांचा-डीजेंचा उच्चतम आवाज, ढोल-ताशांचा दणदणाट, गुलालाची मुक्त उधळण, रस्त्यावर अनियंत्रित गर्दीचा वावर, त्यामुळे होणारी अस्वच्छता, चोऱ्या हे कित्येकांना-विशेषतः शहराच्या मध्यवस्तीत राहणाऱ्यांना असह्य होते. परिणामी, अनेक जण उत्सवाच्या काळात अन्यत्र नातेवाइकांकडे राहण्यास जातात. या वर्गाने यंदा शांती अनुभवली. त्यांची आणि अन्य समविचारी मंडळींची कैफियत तरी काय आहे, हे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बस, रिक्षा सगळेच बंद
उत्सवाच्या केवळ पहिल्या आणि शेवटच्या दिवशी नव्हे, तर या दरम्यानच्या सर्व दिवसांत रहदारीवर मोठी बंधने येतात. रस्ते सायंकाळपासूनच वाहनांसाठी बंद होतात. विसर्जनाच्या वेळी लक्ष्मी रस्ता तर दीड-दोन दिवस केवळ मिरवणुकांसाठी राखीव असतो. तेथील निर्बंधांमुळे त्याच्याशी संलग्न असलेल्या अन्य मुख्य मार्गांवरची ‘पीएमपी’, रिक्षा, कॅब यांची वाहतूक बंद राहते. मिरवणुका शिस्तीत आणि वेळेत पार पडल्या तर ही गैरसोय टळू शकते. अर्थात, सध्या ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर ‘पीएमपी’ बंद असल्याने रस्ते खुले असूनही प्रवाशांना बससेवेचा लाभ घेता आलेला नाही.

आमूलाग्र बदल
विसर्जनाबाबत यंदा आमूलाग्र बदल घडला. नदीत विसर्जन करायचे, महापालिकेने उभारलेल्या किंवा फिरत्या हौदात करायचे की मूर्ती दान करायची, याची चर्चा दरवर्षी होते. मुठा नदीत सांडपाणी सोडले जात असल्याने ती प्रदूषित झाली आहे. तीत आणि अन्य कोणत्याही जलाशयात विसर्जन करू नये, त्यामुळे प्रदूषण आणखी वाढते. ते टाळण्यासाठी अन्य पर्यायांचा वापर करा, असे आवाहन महापालिकेकडून दरवर्षी केले जाते; परंतु आमची परंपरा मोडणार नाही, अशी भूमिका घेऊन अनेक जण नदी-कालव्याचाच आधार घेतात. त्यामुळे खडकवासला धरणातून त्या दिवशी मुठा नदीत पाण्याचे आवर्तन सोडावे लागते. यंदा मात्र त्याची गरज भासली नाही. कारण मानाच्या गणपतींसह सर्व मंडळांनी मंडपातच ‘श्रीं’ना निरोप दिला; तसेच बव्हंशी लोकांनी घरीच हा धार्मिक विधी करून प्रशासनाच्या विनंतीचा आदर केला. हे मोठे विधायक परिवर्तन आहे.

पोलिसांची कसोटी
मुंबईसारख्या महानगरातील विसर्जन मिरवणूक पुण्यापेक्षा लवकर संपते. रस्त्यात दोन मंडळांमध्ये पडणारे अंतर, त्यांचा मोठा लवाजमा, प्रत्येक चौकात होणारे आगत-स्वागत, काही वेळा त्या ठिकाणी चालणारे मानापमानाचे नाट्य, प्रसंगपरत्वे पोलिसांची तटस्थ भूमिका अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. या शेवटच्या दिवशी पोलिसांवर प्रचंड ताण असतो. ड्युटी किती वेळ, याचा हिशेबच त्यांनी ठेवायचा नसतो! नेमून दिलेल्या ठिकाणी त्यांना किमान चोवीस तासांवर दक्ष राहावे लागते. काही मंडळे कधी कधी आडमुठेपणाची भूमिका घेतात. ते रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. परिणामी मिरवणुकीचा खोळंबा होतो. अशा प्रसंगी लाठीमार करण्याची वेळ यापूर्वी पोलिसांवर आली आहे. ही परिस्थिती हाताळताना वरिष्ठांना मोठी कसरत करावी लागते. कारण या घटनांत चूक कोणाचीही असो, अनेकदा पोलिसांनाच जाब विचारला जातो. त्यांनी घटनास्थळी संबंधितांवर थेट कारवाई न करता गुन्हे दाखल केले, तरी नंतर राजकीय दबावाखाली ते मागे घेतले जाण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांना तेवढा धाक वाटत नाही.

आयुक्तांकडून आभार
मिरवणूक वेळेत संपली, तर दुसऱ्या दिवशी त्या त्या भागातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होऊ शकतात; पण ते होत नाही. बडी मंडळे दरवर्षी विसर्जनाची वेळ आधी जाहीर करतात; पण त्याप्रमाणे अंमलबजावणी होते का? कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याला पोलिसांचे प्राधान्य असते. त्यामुळे वेळेचा आग्रह धरण्यावरून मोठा वाद निर्माण होणार असेल, तर तो टाळण्याकडे त्यांचा कल असतो. ते सौम्य भूमिका घेतात.  त्यांच्यासाठी मिरवणूक म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताणाची परीक्षाच असते. यंदा हे टळले आणि उत्सव शांततेत पार पडला, म्हणून पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुणेकरांचे आभार मानले. अशा वेगवेगळ्या कारणांनी यंदाचा गणेशोत्सव आगळा-वेगळा ठरला आहे. कोरोनाचे सावट दूर होऊन परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, अशी आशा आहे. त्यामुळे पुढचा उत्सव अधिक जल्लोशात होईल. मात्र, त्यावेळी सन २०२० मध्ये घडलेले चांगले बदलही स्वीकारण्याचा विचार करायला हवा. यानिमित्ताने सव्वाशे वर्षांपूर्वीच्या आणि सद्यःस्थितीत लागू ठरणाऱ्या मूळ उद्दिष्टांकडे वळण्याचा दृढ संकल्प आपण सगळेच करूयात!

स्वागतार्ह परिवर्तन...

  • उत्सवात ध्वनिप्रदूषण अजिबात नाही
  • रस्ते २४ तास वाहतुकीसाठी खुले
  • मध्य वस्तीची त्रासातून सुटका
  • नदीतील विसर्जनाला विराम
  • फिरत्या हौदांना, मूर्तिदानाला प्रतिसाद
  • पोलिसांना प्रथमच विसावा
  • आवर्तन नसल्याने पाण्याची बचत
  • घरच्या गणपतींचे घरीच विसर्जन

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ramesh doiphode on pune ganeshotsav