esakal | #WeCareForPune : निर्णायक लढाई एका अज्ञात शत्रूशी

बोलून बातमी शोधा

Corona-Danger

‘मरणाची चाहूल लागली होती तिला, शेवटची एकच इच्छा...नातीला शेवटचे डोळे भरून पाहण्याची. मी खिशातून फोन काढला आणि व्हिडिओ कॉल लावला. नातीसह घरातल्या सगळ्यांना तिने गुडबाय केले. कॉल संपल्यानंतर थोड्याच वेळात तिने अखेरचा श्‍वास घेतला.’ इटलीमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉ. फ्रास्न्सिका कोर्टेल्लारो यांचा अनुभव सांगणारी ही पोस्ट व्हायरल झाली.

#WeCareForPune : निर्णायक लढाई एका अज्ञात शत्रूशी

sakal_logo
By
संभाजी पाटील

‘मरणाची चाहूल लागली होती तिला, शेवटची एकच इच्छा...नातीला शेवटचे डोळे भरून पाहण्याची. मी खिशातून फोन काढला आणि व्हिडिओ कॉल लावला. नातीसह घरातल्या सगळ्यांना तिने गुडबाय केले. कॉल संपल्यानंतर थोड्याच वेळात तिने अखेरचा श्‍वास घेतला.’ इटलीमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉ. फ्रास्न्सिका कोर्टेल्लारो यांचा अनुभव सांगणारी ही पोस्ट व्हायरल झाली. त्यांच्या या पोस्टचा शेवट महत्त्वाचा आहे, ‘ही निर्णायक लढाई आहे, ती एका दिसू न शकणाऱ्या अज्ञात शत्रूशी.’ १७६ देशांतील दोन लाखांहून अधिक रुग्णसंख्येला जबाबदार असणाऱ्या कोरोनासोबत असणारी ही लढाई कशी लढायची, हे आपल्याला ठरवायचे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इटलीमधील एका मित्राने एक व्हिडिओ पाठवला. त्यात तो सांगत होता, ‘‘मिलानमध्ये अगदी महाराष्ट्रासारखी ५०-५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या होती. त्या वेळी इथे राहणारे आम्हीही अगदी पुण्यासारखेच बिनधास्त घराबाहेर वावरत होतो. मला काय होणार आहे, असे म्हणत मॉल, थिएटर, रस्त्यांवर गर्दी करत होतो. सरकारने दिलेल्या सूचनांकडे अगदी तुमच्यासारखेच दुर्लक्ष करीत होतो. त्याचे भीषण परिणाम आम्ही पाहिले आहेत. मला ते चित्र आठवले की धसका बसतो, तुम्ही पुणेकर आता तरी शहाणे व्हा, घराबाहेर पडणे टाळा. हे आठ-दहा दिवसच तुमच्या हातात आहेत.’’ डॉ. फ्रास्न्सिका यांची पोस्ट असो किंवा इटली, जर्मनी, फ्रान्स या देशांतल्या मित्रांचा अनुभव. आपल्याला शहाणे व्हायला इतर देशांपेक्षा अधिक काळ मिळाला आहे. त्याचा आपण कसा सकारात्मक उपयोग करून घेतो, हे निर्णायक ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले आहे. हे करण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे. टाळ्या वाजवून कोरोना जातो का? यावर टिंगल टवाळी करण्यापेक्षा या दिवशी पूर्ण क्वारंटाइन होणे महत्त्वाचे आहे. वाढता धोका लक्षात घेऊन पुणेकर ‘क्वारंटाइन’चे काटेकोर पालन करतील, अशी अपेक्षा आहे.

निष्काळजीपणा टाळा
पुण्यातील रुग्णांची संख्या आता दहावर गेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तेवढेच लोक बाधित आहेत. ही संख्या आणखी वाढेल, अशी शक्‍यता शासकीय यंत्रणांकडून वर्तविली जात आहे, अशा वेळी नागरिकांची जबाबदारी अधिक वाढते. मुख्यमंत्र्यांनी पुण्यासह महानगरांमध्ये ‘लॉकडाउन’चे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या वतीने दुकाने, शाळा, मॉल, बागा अशी गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी कार्यालये, उद्योगांना बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले आहे. पण आजही मोठ्या प्रमाणावर आपण कळत-नकळत निष्काळजीपणे वावरताना दिसत आहोत. अशा प्रकारच्या महामारी रोखण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणा झटून उपयोग होत नाही, त्यासाठी प्रत्येक घरातून, प्रत्येक नागरिकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे ‘मी बाहेर पडल्याने काय होणार आहे किंवा मी मास्क नाही वापरला तर काय होईल’ असा विचार सोडून द्यावा लागेल.

आरोग्य यंत्रणा सक्षम हवी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाढत्या रुग्णसंख्येचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना केली जात आहे. पण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी नागरिकांना सूचना पाळाव्या लागतील, लोकप्रतिनिधी व इतर सरकारी यंत्रणांना सोय उपलब्ध करून द्यावी लागेल. आमदार अनंत गाडगीळ यांनी ससून रुग्णालयासाठी व्हेंटिलेटरसाठी आपला निधी दिला, तसे प्रयोग इतर लोकप्रतिनिधींनाही करता येतील. 

संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे
आता आपली लढाई सुरू आहे, ती आपल्या आसपास वावरणाऱ्या, पण न दिसणाऱ्या शत्रूशी. अशा वेळी आपण घरी राहणे, हेच आपले या युद्धातले सर्वांत मोठे योगदान आहे. संसर्गाची साखळी तोडणे हे कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे, तसे केले नाही, तर धोका किती आणि कसा वाढेल, याचा अंदाजही आपल्याला करता येणार नाही. जर स्वत:हून शिस्त पाळली नाही, तर सक्ती करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हे विसरता कामा नये.