लढाई जगणे आणि जगण्याचीच !

Coronawar
Coronawar

आता आपल्याला लढायच्यात दोन लढाया. एक जिवंत राहण्याची आणि दुसरी जगण्याची. दोन्हीही तेवढ्याच महत्त्वाच्या. तेवढ्याच कठीण. दोन्हींमध्येही विजय मिळविल्याशिवाय पर्याय नाही. कोरोना रुग्णांची संख्या एका बाजूला वाढतेय. त्यामुळे त्याला दूर ठेवण्याची पहिली लढाई गेली ५० दिवसांहून अधिक काळ लढतोय, आता दुसरी लढाई या गंभीर परिस्थितीत सर्व काळजी घेऊन लढायची आहे ती पोटासाठी. त्यासाठी मानसिक-शारीरिक तयारीची शस्त्र बाळगावी लागतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युरोपीय देश असणारा स्लोवेनिया कोरोनामुक्त झाल्याची बातमी आजच वाचली. अमेरिका, इंग्लंड, इटलीसह संपूर्ण युरोपात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात इटली, ऑस्ट्रिया, हंगरी आणि क्रोएशिया यांच्या शेजारी असणाऱ्या स्लोवेनियाने कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. या देशाची लोकसंख्या २० लाख आहे. म्हणजे पुण्यातील कंटेनमेंट झोनच्या आसपास. या देशातील व्यवहार आजपासून सुरू झाले आहेत. हे सांगण्याचे कारण एवढेच की, कोरोनावर मात केली जाऊ शकते. दुसरे एक उदाहरण म्हणजे अमेरिकेतील जॉर्जिया या राज्याने २४ एप्रिलपासून आपल्या प्रांतातील लॉकडाऊन हळू-हळू उठवला. तो उठवताना योग्य ती सर्व काळजी घेतली. आज अमेरिकेतील कडक लॉकडाऊन पाळणाऱ्या राज्यांपेक्षा याठिकाणच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या फारच कमी आहे. आता पुण्यातील चित्र पाहू. 

पुण्यात आठवडाभरात सुमारे हजाराच्या आसपास रुग्ण वाढले. आजपर्यंत रुग्णांची संख्या ३१०० पर्यंत तर मृतांचा आकडा १७४ पर्यंत पोचला. याकाळात आपण प्रतिबंधित असणाऱ्या ६९ क्षेत्रातील लॉकडाऊन अधिक कडक केले. पेठांच्या भागात अगदी पत्रे टाकून रस्ते बंद केले. नागरिकांना घरोघरी जाऊन धान्याचे कीट दिले. तरीही दाट वस्तीच्या भागात विशेषतः झोपडपट्टी भागात आपल्याला प्रसार रोखण्यास विशेष यश आले नाही. त्याची कारणे अनेक आहेत. पण, दाटीवाटी आणि दारिद्य्र ही त्यातील दोन मुख्य कारणे. आता यातून मार्ग काढून पुण्याला वाटचाल करायची आहे.

एका बाजूला कोरोनाला हरवायचे आहे, दुसरीकडे व्यवसाय, उद्योग सुरू करून जनजीवन सुरळीत करायचे आहे. ही लढाई लढताना थोडी सावधानी, थोडी काळजी, चतुराई, कल्पकता दाखवली तर कोरोनाला सोबत घेऊन आपल्याला विजय मिळवणे अवघड नाही. स्लोवेनिया असो किंवा जॉर्जिया ही उदाहरणे आपल्यासमोर आहेत. 

पुण्यात जवळ-जवळ ८० टक्के भाग खुला असल्याचा दावा महापालिका आयुक्तांनी केला आहे. म्हणजेच या ठिकाणी काही अटी घालून दुकाने आणि इतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही अनेक गोष्टी बंद आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी दळणवळण, चलनवलन सुरू होऊ शकले नाही. मजूर नसल्याने कामे सुरू झालेली नाहीत.

त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊन ४ मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पुण्यात धोका आहेच. पण पुण्याची चक्र सुरू झाल्याशिवाय जिल्ह्यातील आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील चक्रेही सुरू होणार नाहीत. ही चक्र सुरू झाली नाहीत तर जगण्याची दुसरी लढाईही आपण हरू. त्यामुळे जगण्याच्या सवयी, विचार करण्याची, कामाची पद्धत बदलावी लागेल. नियम अंगवळणी पाडावे लागतील. लॉकडाऊन ४ अधिक परीक्षा पाहणारे आणि तेवढ्याच नव्या संधींचे असेल, हे मात्र नक्की !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com