असे नग, असे नमुने...!

Panchnama
Panchnama

‘कोणाचं हृदयाचं ऑपरेशन करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा. कमी खर्चात करू. ‘आय-ट्यूब’वर मी कालच शिकलोय. मित्राच्या या व्हॉट्सअॅपवरील मेसेजने मी उडालोच. हल्ली कोण, कधी आणि काय शिकेल, हे सांगता येत नाही. जो तो एकलव्याच्या भूमिकेत शिरून, स्वतःच ज्ञान संपादन करायला बघतोय.  
‘अरे वेडा झालास काय?’’ मी त्याला फोनवरच झापलं. 
‘अरे ऑनलाइन क्‍लास व ‘आय-ट्यूब’वर रेसिपी बघून बायको जर सुगरण होत असेल तर मी का मागे राहू. हम किसीसे कम नही.’’ मित्राने त्याची बाजू मांडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘तुझ्या छातीत सारखं दुखतं ना. करून टाकू ऑपरेशन. विश्‍वास ठेव. या हृदयाचं त्या हृदयाला कळणार नाही. शिवाय स्वस्तात. ’’
‘तू ऑपरेशन केल्यावर या हृदयाचे त्या हृदयाला कळणार नाही पण यमराजाला नक्की कळेल,’’ असे म्हणून मी रागाने फोन ठेवून दिला. मलाच असे नग आणि नमुने का भेटतात, कोणास ठाऊक! 
‘आपण भसाड्या आवाजाची स्पर्धा घेऊ. निवडक भसाडे आवाज ‘आय-ट्यूब’वर टाकू. सोशल मिडियावर असली लोकं ‘गुली’गत चालत्यात. एन्ट्री फी शंभर रुपये ठेवू.’’ एका मित्राने मला नवीन आयडिया दिली.

‘या स्पर्धेत स्वतःचा पहिला नंबर येणार, याची खात्री असल्यानेच अशी स्पर्धा तुला घ्यावीसी वाटतेय. खरं ना!’’ मी असं बोलल्यावर त्याने माझ्याशी महिनाभर अबोला धरला होता.

चीनमधील एक व्हिडिओ पाहून आपण ‘चीनला झुरळं निर्यात करू आणि बक्कळ पैसा कमवू.’ घरातील झुरळ पाहून किंचाळणारा माझा एक मित्र माझ्याशी गांभीर्याने चर्चा करीत होता. ‘‘आपण काय करायचं माहीत आहे का? आपण गृहनिर्माण सोसायट्यांत जायचं आणि झुरळं साफ करायचं कंत्राट घ्यायचं. त्यावेळी सोसायट्यांवाल्यांकडूनही चांगले पैसे घ्यायचे बरं का? नंतर तीच झुरळं आपण चीनला पाठवायची. दोन्ही बाजूंनी आपलाच फायदा.’’ मात्र, त्याची ही आयडिया मी झुरळ झटकल्यागत झटकली. कांद्याचे भाव पडल्यानंतर एक मित्र माझ्याकडे आला होता. आपण शेतकऱ्यांकडून कांदा विकत घेऊ व त्याच्यापासून दारू बनवू व तिचे नाव ‘कां‘दारू’ असे ठेवू. ही दारू कशी बनवायची, हे मी ‘आय- ट्यूब’वर शिकून घेतलंय. यामुळे शेतकऱ्यालाही चार पैसे मिळतील आणि आपलंही भलं होईल. ‘आयडिया माझी, भांडवल तुझे’ अशी ही योजना आहे. मी मात्र, त्याला कोपरापासून हात जोडले.

‘बायकोने केलेला फराळ खाण्याची स्पर्धा’ असे एक चॅनेल आय-ट्यूबवर एका मित्राने काढले. मी आधी त्याला चांगलेच वेड्यात काढले. मात्र, समस्त महिलावर्गाचा या चॅनेलला पाठिंबा वाढत गेला आणि नवरेमंडळीही तोंड वाकडे करीत का होईना, मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभागी झाली. कारणं काहीही असली तरीही महिनाभरातच दहा लाख जणांनी हे चॅनेल सबक्राईब केले. हे पाहून मी मित्राला साष्टांग नमस्कार घातला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com