व्यायाम न करता, वजन करा कमी

व्यायाम न करता, वजन करा कमी

गेल्या काही दिवसांपासून आम्हाला पॅंट घालताना खूप त्रास होऊ लागला आहे. कधी-कधी वीस-तीस मिनिटेही आम्हाला पॅंट घालायला लागतात. आमचे पोट अंमळ जास्तच सुटल्याने व वजनाने शंभरी ओलांडल्याने हा त्रास होऊ लागला होता. फेसबुकवर फोटो टाकताना आमचे पोटच फार पुढे यायचे. फोटो काढताना श्वास रोखून रोखून किती धरायचा. त्यामुळे अनेक जण आमची चेष्टाही करायचे. पोट आणि वजन कमी केले नाही तर आमच्या प्राणप्रिय आठ-दहा पॅंट फेकून द्यायला लागणार होत्या आणि हीच गोष्ट आमच्या जीवाला लागली होती. त्यामुळे पॅंट फेकून देण्यापेक्षा वजन कमी केलेले केव्हाही बरं. हा आम्ही निर्धार केला.

वजन कमी करण्याची आमची तयारी आहे; पण वजनाची आहे का?, असाही विचार मनात आला. शेवटी आयुष्यात कोणतीही अडचण आली, की आम्ही संकटमोचक, सल्लागुरू फेसबुक यांची नेहमी मदत घेतो. वीस  किलो वजन कमी करायचे आहे, काय करू, अशी पोस्ट आम्ही तिथे टाकली आणि तासाभरात चारशे लाईक आणि आठशे कमेंटवजा सल्ले आले अन्‌ आम्ही कृतकृत्य झालो. रोज सकाळी एक किलो मोहरी घ्या आणि जमिनीवर टाका आणि एक एक दाणा उचलत जा. त्यानंतर सायंकाळी खसखस घ्या, तसेच करा, असा सल्ला एकाने दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिम जॉइन करा, असा एकाने सल्ला दिला होता; पण त्याचा काही उपयोग नसतो, हा आमचा स्वानुभव आहे. कारण चार महिन्यांपूर्वीच आम्ही जिम जॉइन केली; पण फरक काही पडला नाही. त्यावर बायको म्हणते तिथे रोज जावे लागते. यावर आम्ही तोंडच फिरवले. अनेकांनी तर हे ‘सोडा’ आणि ते ‘सोडा’ असेच सल्ले दिले; पण ‘सोड्या’शिवाय आमची सायंकाळची मैफल रंगणार कशी, या विचाराने आम्ही बेचैन झालो. रोज सकाळी फिरायला जा, हा सल्लाही आम्ही अमलात आणला आहे. फक्त येताना रोज तीन-चार वडा-पाव खाऊन यायचो. भूकच तेवढी लागलेली असायची, त्याला आम्ही काय करणार; पण एवढे करूनही तीन महिन्यांत पावशेरही वजन कमी झाले नाही. वजन कमी करणे हे  काही ’खायचे’ काम नाही, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. 
शेवटी फेसबुकपेक्षा आम्ही एका आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा ठरवला व शेवटी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी वजन कसे कमी करावे, यावर चांगले १५ मिनिटे लेक्‍चर दिला; पण त्यांनी सांगितलेले सगळे उपाय करून झाले होते, तर काही फारच अशक्‍य कोटीतील होते. मी त्यांना स्पष्टपणे तसे सांगितले. त्यावर त्यांनी वजन कमी करण्याचा उद्देश काय आहे, असे विचारले. त्यावर आम्ही पॅंटची समस्या सांगितली व दुसरी फेसबुकवर फोटो टाकताना येणारी अडचण सांगितली. 

तुमचे पोट दिसू नये, यासाठी फोटो फक्त छातीपर्यंतच काढायचे, असा सल्ला देऊन त्यांनी एक हजार रुपये फी घेतली. सध्या फेसबुकवर आमचे फक्त क्‍लोजअपचेच फोटो का दिसतात, हे कळलं ना.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com