सौ (चा) बार; आम्ही गार..!

सु. ल. खुटवड
Saturday, 26 December 2020

आमच्यावर संशय घ्यायचं बायको कधी थांबवणार आहे, कोणास ठाऊक. तरी बरे, ती बरोबर असताना आम्ही मान वर करून परस्त्रीकडे बघतही नाही. चुकून एखादीकडे लक्ष गेलंच तर ‘बघा... बघा... डोळे फाडून बघा. सोबत बायको आहे याची तरी जाण ठेवा,’ असं आपण जिच्याकडे पाहात होतो, तिला ऐकू जाईल, एवढ्या मोठ्याने ती म्हणते.

आमच्यावर संशय घ्यायचं बायको कधी थांबवणार आहे, कोणास ठाऊक. तरी बरे, ती बरोबर असताना आम्ही मान वर करून परस्त्रीकडे बघतही नाही. चुकून एखादीकडे लक्ष गेलंच तर ‘बघा... बघा... डोळे फाडून बघा. सोबत बायको आहे याची तरी जाण ठेवा,’ असं आपण जिच्याकडे पाहात होतो, तिला ऐकू जाईल, एवढ्या मोठ्याने ती म्हणते. त्यामुळे आम्ही ओशाळून जातो. एखाद्या महिलेचा फोन आला की लगेच ती कान टवकारते व नंतर फोनही चेक करते. यामुळे आम्ही अनेक मैत्रिणींची नावे ‘प्लंबर’, ‘वायरमन’, ‘इस्त्रीवाला’ या नावाने सेव्ह केली आहेत.

पण तरीही संशय घेणं काही कमी झालं नाही. आता कालचीच गोष्ट. थंडीचे दिवस असल्याने आम्ही ऑफिसमधून लवकर घरी निघालो व तसं बायकोला कळवलं. ‘आज मस्तपैकी शाही पुलाव कर. घरी आल्यावर तुला सरप्राईज देतो,’ असा निरोप दिला. तिला फार आवडतात म्हणून शनिपाराजवळ मोगऱ्याचे गजरेही घेतले. टिळक रस्त्यावरील एका मेडिकलमधून काही औषधे घेतली. तेवढ्यात आमच्या कॉलेजमधील शिवानी दिसली. मला मोठा आश्‍चर्याचा धक्का बसला. इकडचे-तिकडचे बोलणे झाल्यानंतर ‘अरे आपण रस्त्यात काय बोलतोय. ‘गिरिजा’मध्ये चल, काहीतरी खात बोलू’ शिवानीच्या या प्रस्तावाला आम्ही नकार दिला नाही. आम्ही मसाला डोसा व कॉफीची ऑर्डर दिली. त्यानंतर बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो. जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्याजवळील मोगऱ्याचे गजरे पाहून शिवानीने ‘मलाही फार गजरे आवडतात,’ असे सांगितले. तिच्या मनातील भाव ओळखून आम्ही तिला गजरे सप्रेम भेट दिले. त्यानंतर तिने लगेचच ते केसात माळले. खाणं-पिणं झाल्यानंतर हात धुण्यासाठी मी बेसिनकडे गेलो. परत आल्यानंतर बघितले तर शिवानी माझ्या फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे कोणाशी तरी बोलत होती. फोन झाल्यानंतर ती म्हणाली, ‘‘मनोज, अरे तुझा फोन टेबलवर राहिला होता. तेवढ्यात फोन वाजला म्हणून मी घेतला तर तो तुझ्या मिसेसचा होता.’’ तिने खुलासा केला. हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले. ‘काय सांगितलंस तू’? आम्ही भीतभीत म्हटले. ‘‘काही नाही. मी शिवानी बोलतेय. मी मनोजच्या कॉलेजमधील मैत्रीण आहे. आम्ही आता गिरिजा हॉटेलमध्ये मसाला डोसा खातोय. मनोज आताच बेसिनकडे गेलाय. आल्यावर त्याला फोन करायला सांगते.’’ असे सांगितले. 
‘अगं पण तू फोन कशाला घेतलास’’आम्ही रागाने म्हटले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अरे दोन वेळा रिंग वाजली म्हणून घेतला. नंतर त्यांनीच व्हिडिओ कॉल केला. ‘तुम्ही माळलेले गजरे छान आहेत,’ अशी कॉम्पलीमेंटही त्यांनी दिली. ‘अहो, हे गजरे मनोजनेच दिलेत,’ असं मी सांगितलं. हे सगळं ऐकून आमच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर आम्ही बायकोला आठ-दहा फोन केले. एकदाही तिने रिसिव्ह केला नाही. आम्हाला पुढला रणसंग्राम डोळ्यासमोर दिसू लागला. आम्ही तातडीने घराकडे कूच केली. रात्रीचे दहा वाजले होते व थंडीही चांगली जाणवू लागली होती. दारात आल्यानंतर बराच वेळ बेल वाजवली. फोनही केले; पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. जोरजोराने दार ठोठवावे तर शेजाऱ्या-पाजाऱ्यांना फुकटचा तमाशा दाखवून, त्यांच्या आनंदात भर घालायची नव्हती. शेवटी दारासमोरील पॅसेजमध्येच थंडीत कुडकुडत आख्खी रात्र घालवली. सकाळी सातच्या सुमारास पॅसेज स्वच्छ करण्याच्या नावाखाली बायकोने थंड पाण्याची बादली आमच्या अंगावर ओतली; पण तिला जाब विचारण्याचंही धैर्य आमच्या अंगी नव्हतं. आम्ही शांतपणे एवढंच म्हणालो, ‘पाणी ओतलंच आहेस तर साबण आणि टॉवेल तरी दे. येथेच अंघोळ करून घेतो.’

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Sl Khutwad