
कधी पायावर उभा राहता येईल का..?
पुणे : कधी पायावर उभा राहता येईल का... कधी स्वतःचे काम स्वतः करता येईल का... अशा विचारत असलेल्या जम्मू काश्मीरच्या मच्छल खोऱ्यातील दिव्यांग स्थानिकांना कृत्रिम अवयव मिळाले आहे. या अवयवांमुळे त्यांच्यात पुन्हा मोठा उत्साह आला असून आपणही सामान्य जीवन जगू शकतो ही भावना निर्माण झाली आहे. दुर्गम भागात असल्याने अपेक्षित सुविधांपासून वंचित या स्थानिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब ठरली आहे.

भारतीय सैन्यदलाच्या वतीने भगवान महावीर विकलांग सहायता समिती (बीएमव्हीएसएस) जयपूर फूट संस्थेच्या समन्वयाने मच्छल गावात कृत्रिम अवयव फिटमेंट या सहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. येथील स्थानीकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने सैन्यदलातर्फे सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तर या मोहीमे अंतर्गत दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, तीनचाकी सायकल, कुबड्या आदींचे वाटप करण्यात आले. गरजू दिव्यांगांना मदत करणे हा या मागचा मुख्य उद्देश होता. यामध्ये एकूण सहा कृत्रिम अवयव, ३३ व्हीलचेअर, ३५ श्रवणयंत्र, पाच तीनचाकी सायकल, पाच कुबड्या आदींचे वाटप करण्यात आले. या शिबिराचा लाभ केवळ मच्छलच्या स्थानिकांनाच नाही तर जवळपासच्या जिल्ह्यातील गरजू दिव्यांगांना ही झाला. यामुळे १०० हून अधिक दिव्यांगांना मदत मिळाली.

या शिबिराच्या माध्यमातून जमीनदार गली ब्रिगेड कमांडर यांनी या दिव्यांगांशी संवाद साधला. उत्तर काश्मीरमधील लोकांपर्यंत कृत्रिम अवयव सेवा पोचविण्यासाठी जयपूर फूट संस्थेचे कौतुक केले. तसेच दिव्यांगांना मदत करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन लष्कराकडून सातत्याने केले जातील असे आश्र्वासन ही त्यांनी केले.
‘‘कोरोना काळापासून सैन्यदलासोबत मच्छल गावात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून हे कृत्रिम अवयव फिटमेंट शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामुळे येथील दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळाल्याने त्यांचे जीवन सुखकर झाले आहे. भविष्यात या भागांमध्ये आणखीन काही मोहिमा राबविण्याचे प्रयत्न करणार आहोत.’’
- सुधीर मेहता, अध्यक्ष- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)
Web Title: Artificial Organ Fitness Camp Machchal Village Indian Army Bhagwan Mahavir Disability Support Committee Jaipur Foot
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..