
पुणे - स्टिल आणि सिमेंटच्या दरांत झालेल्या कृत्रिम दरवाढीबद्दल देशातील बांधकाम व्यावसायिकांनी केंद्र सरकारच्या विविध विभागांना साकडे घातले आहे. मागणी वाढलेली नसताना आणि कोणत्याही अडचणी अचानक उदभवलेल्या नसतानाही ही दरवाढ कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आठ दिवसांपूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने बांधकामांना सशर्त परवानगी दिली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी सिमेंट, स्टिलची मागणी केल्यावर त्यांना नेहमीपेक्षा जास्त दर सांगण्यात आले. तसेच आता अॅडव्हान्स पेमेंट मिळाल्याशिवाय माल दिला जात नसल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
नफेखोरीचा उद्देश...
बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या राष्ट्रीय संघटनेने या बाबत केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, गृहनिर्माण मंत्रालय, कॉम्पिटिशन कमिशन यांना या बाबत निवेदन सादर केले आहे. संबंधित सिमेंट आणि स्टिल उत्पादक कंपन्यांनी संगमनत करून अचानक दर वाढविले आहेत. त्यातून त्यांचा नफेखोरीचा उद्देश स्पष्ट होत आहे. त्यामुळे या बाबत कारवाई करण्याची मागणी क्रेडाईने केली आहे. सिमेंट, स्टिलची मागणी वाढलेली नसताना अचानक दरवाढ कशासाठी? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मजुरांना सक्ती...
शहर आणि परिसरातील लेबर कॅंपमध्ये मजुरांना पोलिस फॉर्मचे वाटप करतात. तो भरून दिल्यावर रेल्वेने लगेचच गावी जाता येईल, असे ते त्यांना सांगत आहेत. मजुरांनी गावी परतावे म्हणून एक प्रकारे पोलिसांची सक्ती सुरू आहे, असे एका बांधकाम व्यावसायिकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. बांधकामे सुरू होत असल्यामुळे काही मजूर थांबू लागले आहेत. परंतु, पोलिस त्यांना सक्ती करीत आहेत. हिंजवडी तसेच उपनगरे आणि शहराच्या हद्दीलगत असे प्रकार घडत असल्याचे त्याने सांगितले.
घरांच्या संख्येवर परिणाम होणार...
बांधकामासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करणारी साखळी सध्या विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी वाहतूक सुरू आहे, तर काही ठिकाणी पोलिस वाहने अडवित आहेत. त्यामुळे वाहतूकदार वाहतूक करण्यास तयार नाहीत. त्यामुळे बांधकामे रखडत आहेत. यातून नजीकच्या काळात घरांच्या किंमती वाढू शकतात तसेच नव्या प्रकल्पांवरही मर्यादा येतील, असे काही बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
असे आहेत वाढलेले दर...
लॉकडाउनपूर्वी घाउक दरात सिमेंटची गोणी २५० रुपयांना. आता १०० रुपये दरवाढ.
किरकोळ बाजारात हा दर ३८० ते ४०० रुपयांपर्यंत.
लॉकडाउनपूर्वी स्टिलचा घाउक दर ३६ रुपये किलो. सध्या ४५ रुपये.
किरकोळ बाजारात हाच दर ४७ ते ५० रुपये.
सिमेंट, स्टिलची अचानक झालेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. त्याच्याविरोधात केंद्र सरकारकडे आम्ही संपर्क साधला आहे. या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसू नये, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी यातून मार्ग काढला पाहिजे.
- सतीश मगर, अध्यक्ष, क्रेडाई - भारत
बांधकाम प्रकल्पांना लागणारी पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पुढे काम कसे करायचे, असा प्रश्न आहे. त्यातच आता दरवाढ झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय जिवंत ठेवायचा असेल तर, सरकारने काही तरी केले पाहिजे.
- अश्विन त्रिमल, बांधकाम व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.