पानगळीचे सौंदर्य ‘कॅनव्हासवर’

पानगळीचे सौंदर्य ‘कॅनव्हासवर’

पिंपरी - झाडांवरून पडलेल्या पानगळीचे अस्तित्व ते काय...? पाचोळाच तो. पण, या पाचोळ्यातही दडलेलं सौंदर्य शोधण्याची एक कलात्मक दृष्टी असली तर त्यातूनही निसर्ग जिवंत होतो. बोलका होतो. पेन्सिल, रंग, ब्रश यांचा वापर न करता वाळलेली पाने, फुले यांच्यापासून पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ कवयित्री व चित्रकार अरुंधती तुळापूरकर यांनी अनोखी चित्रकृती साकारली आहे. 

लहानपणी पिंपळाचे पान पुस्तकात ठेवणे सर्वांनीच अनुभवले. याचधर्तीवर पाचोळा गोळा करून पुस्तकात दडवून ठेवला. कालांतराने पुस्तक उघडताच फुलापानांच्या रंगात किंचित झालेला बदल अनुभवला. मात्र, आकार जसाच्या तसा. जवळून पाहताच त्यामध्ये चित्रांचे आभास दडलेले जाणवले. या पानाफुलांना अलगदपणे पेपरवर चिटकविले आणि झाल्या चित्रकृती तयार. पेन्सिल, पट्टी, रंग आणि ब्रशच्या मदतीशिवाय. चित्रकार तुळापूरकर त्यांचा चित्रकलेचा प्रवास उलगडून सांगत होत्या. 

चित्रकृतींसाठी बांबू, औदुंबर, जास्वंद, तगर, मधू मालती, गुलाब, आपटा, कडुनिंब आदी झाडांची पाने-फुले वापरली आहेत. पणती, लामणदिवा, हत्तीची अंबारी, विदूषकी चेहरे, पक्षी, फुलदाणी, परडी, फुलांचा गुच्छ अशा चित्रकृती त्यांनी तयार केल्या आहेत. तुळापूरकर यांचे पहिले चित्रप्रदर्शन २००२ मध्ये औरंगाबाद येथील सृष्टी आर्ट गॅलरीत झाले. त्यानंतर वेरूळ महोत्सवात (औरंगाबाद), बालगंधर्व कलादालन (पुणे) येथे त्यांनी चित्रप्रदर्शन भरविले. त्यांनी बीएस्सी होम सायन्स केले आहे. १९७६ मध्ये त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मेरीटमध्ये आल्या होत्या. मात्र, घरगुती कारणामुळे त्यांना सरकारी नोकरीत रुजू होता आले नाही. तथापि, त्यांनी आपली चित्रकलेची आवड कायम जपली. त्यामुळेच त्यांना पाचोळ्यापासून कोलाज आर्टमधील उत्तम चित्रकृती बनविता आल्या.

लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. औरंगाबाद येथील ‘जनार्थ’ या स्वयंसेवी संस्थेत १९८९ ते १९९७ पर्यंत महिला संघटिका म्हणून मी काम करीत होते तेव्हा ७० खेड्यांमध्ये आम्ही काम करीत होतो. त्या प्रसंगी शाळेच्या मुलांकडून भेटकार्ड बनवून अमेरिकेला पाठविले जात असे. तेव्हाच मला वाळलेली पाने आणि फुलांपासून निसर्गचित्रे तयार करण्याची संकल्पना सुचली. आतापर्यंत मी १०० चित्रे काढली आहेत. 
- अरुंधती तुळापूरकर, चित्रकार

चिंचवडला मंगळवारपासून चित्रप्रदर्शन
चिंचवडगाव, चापेकर चौक येथील पीएनजी कलादालनात अरुंधती तुळापूरकर यांचे ११ ते १६ डिसेंबरदरम्यान चित्रप्रदर्शन होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ अशी प्रदर्शनाची वेळ असेल. प्रदर्शनात त्यांच्या २० ते २२ चित्रकृती पाहण्यास मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com