सर्व्हेसाठी घरामागे एक रुपया; तोही मिळत नाही; आशा स्वयंसेवकांची व्यथा

सर्व्हेसाठी घरामागे एक रुपया; तोही मिळत नाही; आशा स्वयंसेवकांची व्यथा

पुणे - सहा महिने झाले घरोघरी जाऊन कोरोनाच्या सर्व्हेचे काम करतेय... सध्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सुरू आहे. दिवसाला ५० कुटुंबाचा सर्व्हे करायचा... त्याचे दिवसाला ५० रुपये मानधन. म्हणजे एका घरामागे एक रुपया... मार्चनंतर एक रुपयाही सरकारने दिला नाही... मावळ तालुक्‍यातील आशा स्वयंसेविका सांगत होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांना दरमहा दोन हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये मानधन निश्‍चित केले होते. याबाबत सरकारने १७ जुलै रोजी आदेशही जारी केला. परंतु ही वाढीची रक्‍कम हातात पडली नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने संपाची नोटीस दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे अतिरिक्‍त संचालक महेश बोटले यांनी मोबदला वाढीबाबत आश्‍वस्त केले.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी सरकारने आशा स्वयंसेविकांना प्रतिदिन दीडशे रुपये भत्ता देण्याची तरतूदही केली. परंतु ही रक्‍कम अद्याप मिळाली नाही. एका कुटुंबाचा सर्व्हे करण्यासाठी किमान १५ ते २० मिनिटे लागतात. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरायला सांगितले जाते. घरी विचारतात, महिनाभर काम करून एक रुपया मिळत नाही, मग काम कशाला करता? आम्हालाही कुटुंब आहे, सरकारने याचा विचार करावा. आम्हाला दररोज तीनशे रुपये मानधन द्या...असे स्वयंसेविका डोळ्यात पाणी आणून सांगतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतनामध्ये समाविष्ट करून घेतले आहे. त्यानुसार आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनाही समाविष्ट करून घ्यावे. सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करावे. प्रतिदिन तीनशे रुपये विशेष भत्ता देण्यात यावा. आशा स्वयंसेविकांना माहिती ऑनलाइन भरण्याची सक्‍ती करू नये, अशी त्यांची मागणी आहे.

सरकारने मागण्यांचा विचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत १३ ऑक्‍टोबरपासून संपावर जाण्याचा निर्णय स्थगित केला आहे. परंतु, विविध मागण्यांसाठी १४ ऑक्‍टोबरला जिल्हा परिषद आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करू.
- एम. ए. पाटील आणि नीलेश दातखिळे, पदाधिकारी, आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com