आषाढी वारीबाबत संधिग्दता कायम; निर्णयासाठी आता पुढची तारीख 

टीम ई-सकाळ
Friday, 15 May 2020

देशात कोरोनाबाबतची सध्याची वास्तवता सर्वांसमोर आहे. पुढील काळात कोरोनाची स्थिती कशी असेल याबाबत आताच खात्री देता येत नाही.

आळंदी (पुणे) : ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तत्कालीन परिस्थितीबाबत संबंधित मंत्री, आमदार आणि दिंडी प्रमुखांचे मत जाणून घेऊन आषाढी पायी वारीबाबत 29 मे रोजी अंतिम निर्णय घेतला जाईल,' असे आश्वा सन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 15) येथे दिले.

आणखी वाचा - आषाढी वारीसाठी चोपदारांनी सुचवला पर्याय

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वारीच्या स्वरूपाबाबत सर्व पालखी सोहळा प्रमुख तसेच मानकऱ्यांची भूमिका ऐकून घेऊन सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 15) पुण्यात बैठक झाली. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्‌, संदीप बिष्णाई, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे, योगेश देसाई, डॉ. अभय टिळक, राजाभाऊ चोपदार, देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, माणिक मोरे आणि विशाल मोरे, संजय मोरे, संत सोपानदेव पालखी सोहळ्याचे विश्वस्त ऍड. गोपाळ महाराज गोसावी, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, माधवी निगडे आदी उपस्थित होते. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. पवार म्हणाले, ‘देशात कोरोनाबाबतची सध्याची वास्तवता सर्वांसमोर आहे. पुढील काळात कोरोनाची स्थिती कशी असेल याबाबत आताच खात्री देता येत नाही. त्यामुळे वारीबाबत अंतिम निर्णय घेताना थोडी वाट पाहू. गेल्या काही महिने पोलिस यंत्रणा, आरोग्य आणि महसूल यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. त्यात वारीच्या काळात असाच ताण राहील, याचाही विचार सरकारला करावा लागणार आहे.'

आणखी वाचा - शेती संदर्भात केंद्राच्या महत्त्वाच्या घोषणा

वारकरी पायी वारीवर ठाम पण
पायी वारी ही वारकऱ्यांची साधना आहे. त्यामुळे ती घडावी, अशी मागणी पालखी सोहळ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. अनेक सोहळाप्रमुखांनी निरनिराळे पर्याय मांडले आहेत. एकीकडे वारी झाली पाहिजे अशी भावना आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही, याचाही सोहळ्यातील प्रमुखांना जाणीव आहे. त्यामुळे वारीच्या स्वरूपाबाबत सरकारने दिलेला निर्णय आम्हाला मान्य असेल, असे वारकरी संप्रदायातील प्रमुखांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी मोरे यांनी हेलिकॉप्टरने वारी करण्याचा पर्याय सुचविला आहे. 

आणखी वाचा - पुण्यात सीआरपीएफची पहिली तुकडी दाखल

आळंदी संस्थानने दिलेले पर्याय

  • चारशे वारकऱ्यांना घऊन पायी वारी
  • शंभर वारकऱ्यांना घेऊन पायी वारी
  • तीस वारकऱ्यांसमवेत वाहनातून थेट वारी

​देहू देवस्थानने दिलेला पर्याय

  • पन्नास वारकऱ्यांसमवेत पायी वारी 

चार पालख्यांचा थेट जाण्याचा प्रस्ताव
संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव व संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या वाहनाने थेट पंढरपूरला नेण्याबाबतचा प्रस्ताव संत सोपानदेवांच्या पालखीचे विश्वस्त ऍड. गोपाळ महाराज गोसावी यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यापुढे मांडला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

सोहळा मालकांनाच निमंत्रण नाही 
संत ज्ञानेश्वार महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांना आजच्या बैठकीसाठी निमंत्रण नव्हते. त्याबाबत वारकऱ्यांमध्ये आश्चलर्य व्यक्त करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashadhi vari 2020 meeting will be held 29th may ajit pawar corona lockdown