Ashadhi Wari : शारीरिक, वाचिक व मानसिक तपाचा मार्ग म्हणजे वारी

कोणतेही सत्कार्य करणे सोपे नसते. ते कार्य परीपूर्णतेकडे नेण्यासाठी माणसाला झिजावे लागते. तसेच स्वस्वरुपाचा म्हणजेच आपण नेमके कोण आहोत? याचा अनुभव घेण्यासाठीसुद्धा साधकाला झिजावे लागते.
Ashadhi Wari
Ashadhi Wari sakal

कोणतेही सत्कार्य करणे सोपे नसते. ते कार्य परीपूर्णतेकडे नेण्यासाठी माणसाला झिजावे लागते. तसेच स्वस्वरुपाचा म्हणजेच आपण नेमके कोण आहोत? याचा अनुभव घेण्यासाठीसुद्धा साधकाला झिजावे लागते. याविषयी श्री ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, ‘तैसा स्वरुपाचिया प्रसरा। लागीं प्राणेंद्रियशरीरां। आटणी करणें जें वीरा। तेंचि तप॥’ यातील भाव असा की आत्मानुभवाच्या अभिव्यक्ती करता प्राण, इंद्रिये आणि शरीर यांची आटणी करणे, अर्थात प्राण, इंद्रिये व शरीर यांना आत्मप्राप्तीच्या मार्गात, सन्मार्गात अथवा स्वकर्तव्यामध्ये झिजवणे यालाच तप असे संबोधले जाते. भगवान श्रीकृष्णांनी तपाचे तीन प्रकार सांगितले आहेत. शारीरिक, वाचिक आणि मानसिक.

शारीरिक तपाविषयी ज्ञानेश्‍वर महाराज सांगतात, ‘पार्था समस्तही हें करणें। देहाचेनि प्रधानपणें। म्हणौनि ययातें मी म्हणें। शारीर तप॥ स्थूल शरीराच्या प्राधान्याने जे तप केले जाते, त्याला शारीरिक तप असे संबोधतात. यामध्ये आवडत्या देवतेच्या मंदिराला जाण्याकरता प्रवास करणे. मंदिरातील अंगणाची झाडलोट, सडासंमार्जन करून रांगोळी काढून सुशोभित करून देवाच्या पूजेला शास्त्रांनी सांगितलेले उपचार करण्यासाठी कष्ट करणे. शास्त्रोक्त वर्तन, विनम्रता इत्यादी गुणांनी लोकांत जे श्रेष्ठ असतील, त्या श्रेष्ठांची सेवा करणे. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ आपले आईवडील, त्यांच्या सेवेकरीता शरीर झिजवणे, ज्ञानदान करणाऱ्या आणि दयासंपन्न अशा सद‍्गुरुंची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

वाचिक तप म्हणजे सत्य, प्रिय आणि हितकर स्वरुपाचे बोलणे, सद्ग्रंथांचे पठण अथवा भगवंत नामाचे वाचेने आवर्तन करणे. शिवाय, कोणासही उद्वेग अथवा दुःख होईल असे न बोलणारा. मानसिक तप म्हणजे मनाची अत्यंत शांती होऊन त्याद्वारे प्राप्त होणारी प्रसन्नता, सौम्यता, न बोलण्याचा मनाचा स्वभाव, सर्व बाजूंनी मनाचा निरोध करणे, अंतःकरणाचा निष्कपटपणा होय. श्री ज्ञानराज माऊली मानस तपाविषयी म्हणतात, ‘तें स्वलाभ लाभलेपणें। मन मनपणाही धरूं नेणें शिवतलें जैसें लवणें। आपुलें निज॥’

म्हणजेच मिठाला पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर मीठ आपले मूळ स्वरूप अर्थात पाण्याशी एकरूप होते. त्याप्रमाणे मन मनाचा मनपणा म्हणजेच संकल्प विकल्प करण्याचा स्वभाव परित्याग करून परमात्म स्वरूप होते, ही मानसिक तपाची परिपक्व अवस्था आहे. तपाच्या तीनही प्रकारांद्वारे बाह्य विषयांमध्ये जाणारी शक्ती वाचवून एक विलक्षण सामर्थ्य निर्माण होत असते. त्या सामर्थ्याला योग्य दिशा देणे, योग्य मार्गाला लावणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या सामर्थ्याचा व्यय, उपयोग आत्त्मोन्नतीसाठी होणे आवश्यक आहे.

वारी हे असे माध्यम आहे की, ज्यामध्ये भगवन्नामोच्चरणाने वाचिक तप घडते. भगवंताकडे चालत जात असल्याने कायिक तप घडते. आणि मनामध्ये असलेल्या भगवंताच्या वेधामुळे मानसिक तप घडते. शास्त्रीय परिभाषेत सांगायचे तर वारी या साधनेमध्ये या त्रिविध तपांचे एकसमयावच्छेदेकरून सामान्याधीकरण्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com