
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावण्यास नेहमीच्या तुलनेत मोठा विलंब झाला.
Ashadhi Wari : पुणे मुक्कामी विसावण्यास दोन्ही पालख्यांना मोठा विलंब
पुणे - संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावण्यास नेहमीच्या तुलनेत मोठा विलंब झाला. या दोन्ही पालखी रात्री उशिरा मुक्कामाच्या ठिकाणी विसावल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी सुमारे एक तास तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुमारे दोन तासांच्या विलंबानंतर पुणे येथील आपापल्या विसाव्याच्या ठिकाणी पोचली.
संत तुकाराम महाराजांची पालखी रात्री ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास पुण्यातील टिळक चौकात (अलका टॉकीज चौक), तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रात्री ९ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास टिळक चौकात पोचली. या चौकातून लक्ष्मी रस्त्याने या पालख्या आपापल्या विसाव्याच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाले. भाविकांची अलोट गर्दी, ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात या पालख्या मार्गस्थ होत होत्या. पुणेकरांनी ठिकठिकाणी विशेषतः चौका-चौकांत या पालख्यांचे स्वागत केले.
कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळा झाला नव्हता. परंतु त्याआधीच्या वर्षापर्यंत या दोन्ही पालख्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास टिळक चौकातून आपापल्या विसाव्याच्या ठिकाणांकडे मार्गस्थ होत असत. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला आहे. या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असणार आहे. या पालख्या येत्या शुक्रवारी पहाटे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत.
Web Title: Ashadhi Wari Pune Sant Tukaram Maharaj And Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..