Pune News : विश्वकर्मा कॉलेज, पुण्याच्या अकरावीतील विराजचे खगोलशास्त्रात उल्लेखनीय यश | 11th standard Viraj grate achievement in Astronomy and cycling pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 11th standard Viraj grate achievement  in Astronomy and cycling pune

Pune News : विश्वकर्मा कॉलेज, पुण्याच्या अकरावीतील विराजचे खगोलशास्त्रात उल्लेखनीय यश

पुणे : खगोल शास्त्राबरोबर सायकलिंगमध्येही उच्चतम शिखर गाठले. कोविड-19मध्ये कोरोनाबाधितांजवळ कोणी जात नव्हते, याचा विचार करून रोबोटिक ट्रॉली, प्लाझमा आणि रक्तदात्यांसाठी ऑनलाइन पोर्टल बनविण्याची किमया विराज राहूल शहा या विद्यार्थ्याने करून दाखविली आहे.

विराज शहा हा कोंढव्यातील विश्वकर्मा कॉलेजमध्ये अकरावीत शिक्षण घेत आहे. कोविड-19मध्ये हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांजवळ न जाता सुलभ उपचार करणारी रोबोटिक ट्रॉलीज बनवून विराजने पायवाट सुरू केली. त्यानंतर प्लाझमा आणि रक्तदात्यांसाठी ऑनलाइन पोर्टल, चेन्नईमध्ये पिको सॅटॅलाइटची निर्मिती करून नवा अध्याय सुरू केला आहे.

पुण्याहून झारखंडमधील शिखर्जीपर्यंत 2200 किलोमीटरचे अंतर सायकलिंग करून पंधरा दिवसांमध्ये करण्याची किमया करून दाखविली आहे. आतापर्यंत अनेक संस्था, संघटना आणि प्रशासकीय कार्यालयाकडून त्याचा यथोचित सन्मान झाला आहे.

विराजने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उपग्रह प्रक्षेपण वाहन ऊर्फ ​​APJAKSLV मिशन 2023 हा एक भव्य रॉकेट प्रक्षेपण प्रकल्प १९ फेब्रुवारी २०२३ ला पट्टीपुलम (तामिळनाडू) येथे यशस्वीपणे पूर्ण केला. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट आणि 150 विद्यार्थी-निर्मित पिको उपग्रह प्रक्षेपित करण्याचा होता. हा मेगा प्रोजेक्ट स्पेसझोन इंडियाने एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने केला आहे.

भारतातील पहिले पुन्हा वापरण्यायोग्य (re-usable) तसेच पहिले संकरित (hybrid) रॉकेट 19 फेब्रुवारी, 2023 रोजी तमिळनाडूमधील पट्टीपुलम गावातून यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले.

कोरोना महामारीमध्ये पहिल्यांदा विराजने दोन रोबोटिक ट्रॉलीज बनवून ससून हॉस्पिटल आणि नायडू हॉस्पिटलकडे हस्तांतरित केल्या होत्या . पेशंटच्या जवळ न जाता, डॉक्टरांना पेशंटवर उपचार करण्यात यावे यासाठी या ट्रॉली बनवलेल्या होत्या. या ट्रॉलीसाठी आणि त्याच्या संशोधनासाठी विराजला तत्कालीन, आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित केले गेले आहे.

त्यानंतर त्याने प्लाझमा आणि रक्तदात्यांसाठी ऑनलाईन पोर्टल बनविले होते. ज्यामुळे रक्तदाता आणि गरजवंत यांचा एकमेकांशी सहजासहजी संपर्क होण्यासाठी मदत झाली होती. या पोर्टलचे उद्घाटन तत्कालीन महापौर श्री मुरलीधर जी मोहोळ यांच्या हस्ते झाले होते.

चेन्नईमध्ये विराजने पिको सॅटॅलाइट बनवण्यात यश संपादन केले असून यापूर्वी अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्यातर्फे झालेल्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याने फेमटो सॅटॅलाइट बनविलेले आहेत. फेमटो सॅटेलाईटसाठी विराजला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळालेली आहेत.

खगोल शास्त्राप्रमाणेच विराजला सायकलिंगची खूप आवड असून, दोन महिन्यापूर्वीच त्याने पुण्याहून झारखंडमधील शिखर्जी पर्यंत 2200 किलोमीटरचे अंतर, एकूण नऊ सदस्यांसह सायकलिंग करून पंधरा दिवसांमध्ये पूर्ण केलेले आहे.

खगोल शास्त्रातील या उपक्रमासाठी विराजला श्री मिलिंद चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले होते. या सॅटॅलाइट चा वापर हा हवामान शास्त्राच्या अभ्यासासाठी करण्यात येणार आहे.