Video : 'ते' तलवारी घेऊन अचानक आले अन्...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

अनधिकृत बांधकामाची महानगरपालिकेत तक्रार केल्याच्या संशयावरून खराडी- चंदननगर येथील एका कुटुंबावर सात आठ जणांच्या टोळक्याने तलवारी, लोखंडी सळया घेऊन हल्ला चढवला. 

वडगाव शेरी ः अनधिकृत बांधकामाची महानगरपालिकेत तक्रार केल्याच्या संशयावरून खराडी- चंदननगर येथील एका कुटुंबावर सात आठ जणांच्या टोळक्याने तलवारी, लोखंडी सळया घेऊन अचानक हल्ला चढवला. यात सदर कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (ता. 30) रात्री साडेऩऊच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे या गंभीर घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालेला असतानाही चंदननगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यास तब्बल सतरा तास लावले.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत पवन हरिशंकर साव (वय 38, रा. राजारामपाटील नगर, खराडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार भालेकर, गुलाब खरात (वय 30), संकेत भोसले (वय 30), आकाश सोनवणे (वय 32), आकाश गवई (वय 25), अभिषेक मंगळवाडे (वय 25), संदिप सातव (वय 28, सर्व राहणार खराडी) , तसेच गोल्या आणि पवार ( या दोघांचे पुर्ण नाव माहित नाही) यांच्यावर जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मंगळवारी फिर्यादी पवन, त्याचा भाऊ किशोर, वहिणी राखी व मित्र रदीष राजन नायर हे चौघे घराच्या पार्किंगमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपींनी पार्किंगमध्ये येत आमच्या बांधकामाची तक्रार तु केलीस म्हणत जाब विचारला आणि सोबत आणलेल्या तलवार, लोखंडी रॉड यांनी साव कुटुंबीयांवर हल्ला चढवला.  पार्किंगमधील उभ्या सायकल उचलून त्यांनी साव कुटुंबीयांवर फेकून मारल्या व लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

मध्य पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना मिळणार दिलासा? कॉंग्रेसने केली ही मागणी

या मारहाणीत फिर्यादीचा भाऊ, वहिणी, पुतण्या, मित्र जखमी झाल्याने त्यांच्यावर ससुन रूग्णालयात उपचार करण्यात आले. संशयीत आरोपी तुषार भालेकर याने तलवारीने फिर्यादीवर चढवलेला हल्ला फिर्यादीचा भाऊ किशोर याने हातावर झेलल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र तक्रार देण्यास गेल्यावर गुन्हा दाखल करण्यास दबावापोटी पोलिसांनी तब्बल सतरा तास लावले. तसेच आमच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला असताना फक्त जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला, असा आरोप साव कुटुंबियांनी केला आहे.

पोलिस निरीक्षक शंकर खटके म्हणाले, गुन्ह्यात नेमकी कोणती हत्यारे वापरली त्याचा तपास आम्ही करीत होतो.   तसेच फिर्यादी व आरोपी यांची चर्चा सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला.  

पुढील सहा महिने घरूनच काम; पुण्यातील आयटी कंपन्यांचे धोरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on a family in Chandannagar by eight people