esakal | केंद्र सरकारकडून बळीराजाला चिरडण्याचा प्रयत्न | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

vishwajit kadam

केंद्र सरकारकडून बळीराजाला चिरडण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारकडून मागील दिड वर्षापासून सातत्याने बळीराजाला जाणीवपूर्वक चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरुन केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सोमवारी पुण्यात बोलताना केला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन कर्जमुक्त करत आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जात असताना दुसरीकडे केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या जीवावर उठले आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्यासाठी हिंसक पद्धत वापरली जात आहे, असे मतही कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकर्‍यांचे आंदोलन हिंसक पद्धतीने चिरडण्यात आल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज (ता.११)  ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. या बंदमध्ये आघाडीतील तीनही घटक पक्ष सहभागी झाले होते.

आंदोलन करून बंदला पाठींबा दिला.

यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीतर्फे या आक्रोश सभेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. त्यावेळी कदम बोलत होते.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार आणि तीनही पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनातील सदस्य उपस्थित होते.

कदम म्हणाले, ‘'मागील दीड वर्षापासून हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी शेतकर्‍यांवर गोळीबार केला आहे. आता लखीमपूर येथील घटना घडली आहे. ज्या बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जाते, त्या बळीराजाला चिरडण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. भाजपच्या या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तीनही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे होते. म्हणून आम्ही एकत्र येऊन या प्रवृत्तीचा नायनाट करण्याचा निर्धार केला आहे"

या आक्रोश आंदोलनात "आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई‘ या गीतासह मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसरात निषेध व्यक्त करण्यात आला.

विरोधकांना लक्ष करण्यास स्वायत्त यंत्रणांचा वापर

देशात स्वायत्तता असणार्‍या सुरक्षा यंत्रणा, एजन्सी, केंद्रीय यंत्रणांचा वापर भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना, नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना लक्ष करण्यासाठी करत आहे. ही अत्यंत चुकीची बाब असून भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचे मत विश्वजीत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

loading image
go to top