
वडीलांना दुपारी जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या 7 वर्षाच्या मुलीला भरदिवसा एकाने उचलून नेत तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला.
7 वर्षाच्या मुलीला भरदिवसा उचलून नेत लैंगिक शोषणाचा प्रयत्न
पुणे - खाद्यपदार्थांचा स्टॉल चालविणाऱ्या वडीलांना दुपारी जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या 7 वर्षाच्या मुलीला भरदिवसा एकाने उचलून नेत तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेत घर गाठून घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. हि घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडीलांचा पुणे स्टेशन परिसरात खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. मुलगी नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी तिच्या वडीलांना जेवणाचा डबा घेऊन गेली होती. वडीलांना डबा दिल्यानंतर मुलगी पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहाच्या पाठीमागील रस्त्यावरील रेल्वे पोलिसांच्या जुन्या कार्यालयाजवळुन जात होती. त्यावेळी तेथे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने मुलीला उचलून जवळच्याच कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बंद कार्यालयात नेले. तिथे त्याने मुलीला आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलीने त्यास लघुशंकेला जाऊन येते असे सांगून स्वतःची सुटका करून घेतली.
मुलगी तेथून धावत असतानाच तिच्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी तिला विचारणा केली, तेव्हा तिने घडलेली घटना त्यांना सांगितली. त्यांनीही तत्काळ घटनास्थळी आरोपीचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान, मुलीने घरी गेल्यानंतर तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी बंडगार्डन पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध बालकांचे लैंगिंक शोषण प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिल्पा लंबे करीत आहेत.
'मुलीने मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करुन घेत पोलिस ठाणे गाठले. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा कसून शोध सुरू आहे.'
- शिल्पा लंबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे.