
औंध : मुंबई-बंगळूर महामार्गास समांतर असलेल्या सेवा रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सूसखिंड, बिटवाईज चौक, राधा चौक ते वाकडच्या दिशेला मुळा नदीपर्यंत असलेल्या महापालिकेच्या या सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या किरकोळ व गंभीर अपघाताच्या घटनांमुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. त्यात आता पावसामुळे ही स्थिती अधिकच गंभीर झाली असून सुतारवाडी ते महाळुंगे हद्दीतील रस्ता अपघातमुक्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह प्रवाशांनी केली आहे.