लहान मुलांसाठी लेखन करणे ही कठीण गोष्ट : राजीव तांबे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

पुणे : लहान मुलांसाठी लेखन करणे ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र, उमेश घेवरीकर यांना लहान मुलांच्या भावविश्वाची नेमकी नस आपल्या साहित्यात पकडता आली, त्यामुळेच कुठलेही उपदेशाचे डोस न पाजता त्यांनी सकस साहित्य लिहिले, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी केले.

पुणे : लहान मुलांसाठी लेखन करणे ही खूप कठीण गोष्ट आहे. मात्र, उमेश घेवरीकर यांना लहान मुलांच्या भावविश्वाची नेमकी नस आपल्या साहित्यात पकडता आली, त्यामुळेच कुठलेही उपदेशाचे डोस न पाजता त्यांनी सकस साहित्य लिहिले, असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी केले.

शेवगाव (नगर) येथील बाळासाहेब भारदे विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक तथा लेखक-पत्रकार उमेश घेवरीकर यांच्या 'हृदयस्थ' (कविता संग्रह) व 'विजेता' (बालकुमार साहित्य) या दोन पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण, लेखिका दिपा देशमुख, माधव राजगुरू, चित्रपट दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, प्राचार्य रमेश भारदे, शब्दगंध प्रकाशनचे सुनिल गोसावी, संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, प्रकाश पारखी, देवदत्त पाठक, सुनिल महाजन, धनंजय सरदेशपांडे, राजकुमार तांगडे, जयंत येलूलकर, हरिष भारदे आदी यावेळी उपस्थित होते.

माधव राजगुरू म्हणाले, 'उमेश घेवरीकर यांनी लिहिलेल्या विजेता या कथा संग्रहात 7 कथांचा समावेश आहे. शाळा, शाळेचा परिसर, विद्यार्थी, पालक यावर त्या आधारित असून, त्यांनी शिक्षक, पालक व मित्र या भूमिकेत शिरून मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडवले. सामाजिक भान ठेवून राष्ट्र प्रेम, श्रम प्रतिष्ठा, संस्कार ही जीवनमूल्ये त्यांनी या कथांमधून अधोरेखित केले आहे.' योगेश सोमण म्हणाले, 'घेवरीकर या उपक्रमशील शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे सर्व बाजूने पाहिल्यामुळेच त्यांच्या कथा अधिक दर्जेदार झाल्या आहेत. रिमा अमरापूरकर म्हणाल्या, 'घेवरीकर हे केवळ शिक्षक, लेखक व पत्रकार नसून, अत्यंत संवेदनशील माणूसही आहेत.'

घेवरीकर म्हणाले, 'विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रकाशन समारंभास उपस्थिती लावल्यामुळे आज माझ्या हातावर खऱ्या अर्थाने भाग्यरेषा उमटल्या असे मला वाटते.' दीपक कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. निलेश मोरे व मिनाक्षी कदम यांनी सूत्रसंचालन केले. जयंत येलूलकर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Author Umesh Ghevarikars two book publication at pune