औद्योगिक महामंडळाच्या निकालाची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक महामंडळ

औद्योगिक महामंडळाच्या निकालाची प्रतिक्षा

पुणे : महाराष्‍ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) २०१९ मध्ये ८६५ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. नुकतेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या राहुलने या पदासाठी अर्जही केला होता. कोरोनामुळे भरती प्रक्रिया सव्वा दोन वर्षे रखडली. अखेर ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ मध्ये ही परीक्षा पार पडली. आरोग्य विभागाच्या वादग्रस्त भरती प्रक्रियेमुळे आधीच राहुल चिंताग्रस्त होता. ही परीक्षा सुरळीत पार पडल्याने त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र आज साडे तीन महिने होऊन गेले तरी परीक्षेचा निकाल अजूनही घोषित झाला नाही. त्यामुळे राहुलसह राज्यभरातील सर्वच उमेदवार आता हवालदील झाले आहे.

हेही वाचा: ‘डॉ. पंदेकृवि’ ची राष्ट्रीय पातळीवर २६ व्या स्थानी भरारी

एमआयडीसीतर्फे गट क आणि गट ड संवर्गातील विविध पदांसाठी ही भरती घेण्यात आली आहे. यामध्ये शिपाई, मदतनीसापासून ते कनिष्ठ अभियंत्या पर्यंतच्या संवर्गांचा समावेश आहे. उमेदवार सागर पाटील म्हणतो,‘‘राज्य शासनाच्या मेगा भरती अंतर्गत होणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी आम्ही अर्ज केला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या गट क आणि ड च्या पदांसाठी आम्ही अर्ज केला होता. ऑनलाइन प्रणालीद्वारे झालेल्या या परीक्षेच्या निकालाबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही याबद्दल कोणतीच हालचाल होत नाही. माझ्या सारखे अनेक विद्यार्थी आता हवालदील झाले आहे.’’ गट क आणि ड संवर्गातील पदासाठी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी अर्ज करतात. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून, लांबलेल्या निकालामुळे आणि सरळसेवेतील गोंधळामुळे उमेदवार संभ्रमावस्थेत आहे. यासंबंधी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही पत्र देण्यात आले आहे.

संवर्ग : पदांची संख्या

१) शिपाई : ५६

२) मदतनीस : २७८

३) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ३५

४) कनिष्ठ अभियंता (विवयां) : ९

५) लघुलेखक : २०

६) लिपिक टंकलेखक : २११

७) वीजतंत्री : ९

८) पंपचालक : ७९

९) जोडारी : ४१

१०) तांत्रिक सहाय्यक : ३४

११) वाहनचालक : २९

१२) भूमापक : २९

१३) सहायक : ३१

१४) वरिष्ठ लेखापाल : ४

एमआयडीसी भरती प्रक्रिया रखडत चालली आहे. ऑनलाइन परीक्षा होऊनही निकाल तीन महिन्यांहून अधिक काळ रखडला आहे. लवकरात लवकर निकाल लावावा अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.

- अभिजित आवारी, उमेदवार

व्यक्त व्हा...

राज्यातील सर्वच सरळसेवा भरती प्रक्रिया वादात सापडत असल्याचे आपल्याला वाटते का? ज्या भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्या त्यांचे निकाल उशिरा घोषित होणे योग्य आहे का? आपले मत, आपल्या नावासह पुढील क्रमांकावर व्हॉट्सअप करा ८४८४९७३६०२

Web Title: Awaiting The Outcome Of The Industrial Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsResult
go to top