
"कोरोनामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुयात', "घरीच विसर्जन करा", "गर्दीत जाण्याचे टाळा,' असा संदेश देत आहेत, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे व तारका. उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, पुणेकरांमध्ये जागृती घडविण्यासाठी मराठी कलाकारांनी कंबर कसली आहे.
पुणे : "कोरोनामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुयात', "घरीच विसर्जन करा", "गर्दीत जाण्याचे टाळा,' असा संदेश देत आहेत, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे व तारका. उत्सवकाळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, पुणेकरांमध्ये जागृती घडविण्यासाठी मराठी कलाकारांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेत उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
- पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 'श्रीगणेशा'!
शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे पोलिसांकडून मार्च महिन्यापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरवर्षी सुरक्षेच्या कारणास्तव गणेशोत्सवात पोलिस सतर्क असतात, यंदा मात्र, त्यांच्यावर कोरोनाचा संसर्ग रोखण्याचीही आणखी एक जबाबदारी आली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुणे महापालिकेच्या सहकार्याने पुढाकार घेत पुणेकरांमध्ये जनजागृती करण्यास प्राधान्य दिले आहे.
घरात विसर्जन, सुरक्षित विसर्जन. @DGPMaharashtra @AnilDeshmukhNCP @PMCPune pic.twitter.com/uNb4iafV5Y
— PUNE POLICE (@PuneCityPolice) August 21, 2020
पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टितील अनेक कलाकारांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतानाच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर, सुबोध भावे, उपेन्द्र लिमये, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रुती मराठे, ओम भुतकर, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आदी कलाकारांनी जनजागृतीपर व्हिडिओमध्ये सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या व्हिडिओमध्ये यंदाच्या बाप्पाचा देखावा घरीच करुयात, श्री गणेशाची घरीच मूर्ती बनवुन तिचे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन सुबोध भावे यांनी केले आहे. तर घरी मूर्ती बनविणे शक्य नसेल तर बाहेरुन आणा, मात्र तिचे विसर्जन घरीच करा, असे अभिनेत्री श्रुती मराठे यांनी व्हिडीओद्वारे सांगितले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे पोलिस व पुणे महापालिका यांनी केलेल्या आवाहनानुसार मूर्तीचे घरीच विसर्जन करा
- उपेंद्र लिमये, अभिनेता.
समाजावर विचारवंत व कलाकारांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळेच आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाच अनेक मोठ्या कलाकारांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्फत नागरिकांना संदेश दिला आहे. हे व्हिडिओ पाहून पुणेकर नक्कीच त्यानुसार यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने व घरच्या घरी साजरा करतील.
- डॉ. रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.