सुदृढ पिढीसाठी हवी आयुर्वेदीय जीवनशैली - श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुलांच्या हाती मोबाईल नको
मुलांना टीव्ही, मोबाईल पाहत जेवायची सवय लावू नका. त्यामुळे डोळ्यांचे विकार होत आहेत. आपण मुलांना लायटर, काडेपेटी देतो का? मग मोबाईल कशाला द्यायचा? ते थोडावेळ रडतील. आपली सहनशक्ती कमी झाल्याने लगेच त्यांच्या हातात मोबाईल देतो. त्यापेक्षा मुलांना मोकळी हवा, सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रकृती चांगली राहते, असे डॉ. तांबे यांनी सांगितले.

पुणे - समाजात अस्थिरता दिसायला लागते तेव्हा आयुर्वेदातील संस्कारांची गरज स्पष्ट होते. निकोप समाज आणि सुदृढ पिढी घडविण्यासाठी बालसंगोपन करताना आयुर्वेदीय जीवनशैली आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी केले.

कार्ला (ता. मावळ) येथील आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये बालाजी हेल्थकेअर व आयुर्वेद संतुलन यांच्यातर्फे ‘संतुलन गर्भसंस्कार’ पुरस्कार श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे आणि ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. आयुर्वेद संतुलनचे संचालक सुनील तांबे या वेळी उपस्थित होते. वेद मीनल रोहन पाठक आणि उदयन जानकी अभिजित करळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर, अनया स्नेहा राजेंद्र कोळी हिला उत्तेजनार्थ सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि चांदीची वस्तू, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देताना डॉ. तांबे म्हणाले, ‘‘आयुर्वेद हा प्राचीन वेद आहे. त्यात गर्भसंस्कारासह मुलांच्या संगोपनासाठी, उज्ज्वल भविष्याचे शास्त्र आहे. इतर वैद्यकीय शास्त्रांत याबाबत मार्गदर्शन केलेले नाही. यावर ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून यावर लेखमाला सुरू केली. त्यातून ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे पुस्तक तयार झाले. याचा अनेक कुटुंबांना फायदा झाला. त्यामुळे या पुरस्काराची संकल्पना समोर आली. स्त्री बळकट नसेल, तर घरातील सर्वकाही विस्कळित होते. त्यामुळे स्त्री आरोग्यावर औषधे शोधून काढली. ही औषधे परदेशात गेली आहेत. गर्भसंस्कार संगीताची सीडी करताना भारतीय वैद्यशास्त्राने जे नियम सांगितले, तेच स्वीकारले आहेत.

संस्कार हा जसा सांगितला तसाच केला पाहिजे, तरच त्याची परिणामकारकता दिसून येते. मुलांची टाळू भरणे, धुरी देणे, देवाला दिवा लावताना त्यांना सोबत घेणे, वडीलधाऱ्यांचा मान राखायला सांगा, शुभंकरोती, संस्कृत श्‍लोक म्हणायला लावणे, यासह त्याचे स्नायू चांगले होण्यासाठी दही, दूध, तूप खायला देणे हेदेखील आयुर्वेदातील संस्कार आहेत. मुलांकडे जेवढे जास्त लक्ष देऊ, तेवढे त्यांच्यावर संस्कार होतात. मुलांच्या आवाजात निरागसता असते, त्यांना भीती नसते. या आवाजाने घरातील पवित्रता वाढते, ती कायम राखली पाहिजे.’’ 

‘सकाळ फॅमिली डॉक्‍टर’चे समन्वयक संतोष शेणई यांचे या वेळी भाषण झाले. सुनील तांबे, डॉ. भाग्यश्री झोपे यांनी स्वागत केले. डॉ. मालविका तांबे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurvedic lifestyle is essential for a healthy generation Dr balaji Tambe