हुकमी एक्का ताब्यात घेऊन राष्ट्रवादीची कोंडी

- मिलिंद वैद्य
मंगळवार, 10 जानेवारी 2017

पिंपरी - भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीवर निवडणुकीपूर्वीच मात करायचे ठरविलेले दिसते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ज्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार होता; तो हुकमी एक्काच भाजपने आपल्या ताब्यात घेऊन राष्ट्रवादीला कोंडीत पकडले आहे. बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरातील राजकारणाची समीकरणे बदलली असून, या घटनेने मोठे राजकीय ध्रुवीकरण सुरू झाले आहे. भाजपला मुस्लिम चेहरा मिळाला असून, राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातो.

महापालिकेच्या फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणूक निकालावर या घडामोडींचा परिणाम संभवतो. पानसरे यांची बहुजनांचा नेता, अशी प्रतिमा आहे. गाववाले आणि बाहेरचे या संघर्षात पानसरे बाहेरच्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात. किंगमेकर असलेल्या पानसरे यांचा प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीने वापर केला; पण त्यांच्या पदरात राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीच्या अध्यक्ष पदाव्यतिरिक्त एकही मोठे पद पडले नाही. मुस्लिम असल्यानेच आपल्याला डावलले जात असल्याची सल पानसरे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात होती. त्यामुळेच ते योग्य संधीची वाट पाहत होते.

"हमको वफा की थी उम्मीद उनसे, मगर वह नहीं जानते वफा क्‍या है!' या एकाच वाक्‍यात पानसरे यांचे समर्थक भाईजान काझी यांनी राष्ट्रवादीबाबत आपले मत व्यक्त केले. यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा लक्षात येते.

पानसरे यांच्यापाठोपाठ सुमारे आठ ते दहा आजी-माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसहित कार्यकर्तेदेखील गोंधळून गेले आहेत. सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचा नोटाबंदीच्या विरोधात मोर्चा होता. तो आटोपल्यावर सर्व समर्थक त्यांच्या कार्यालयात दाखल झाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीदेखील पानसरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते गोंधळल्याचे स्पष्ट दिसते.

आगामी निवडणुकीसाठी नुकत्याच राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या मुलाखती झाल्या. या मुलाखतीच्या वेळी पानसरे राष्ट्रवादीसोबत होते. आता समीकरणे बदलणार असल्याने काही प्रमाणात उमेदवारही बदलणार आहेत. पानसरे समर्थकांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मुलाखती हा आता निव्वळ फार्स ठरला आहे.

राष्ट्रवादीचे नुकसान
* आता मदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहल, संजोग वाघेरे यांच्यावर
* निवडणुकीपर्यंत आणखी पडझड होण्याची शक्‍यता
* अल्पसंख्य-बहुजन चेहरा गमावल्याने मते फुटणार
* स्थानिक मोठे नेते अजित पवार यांच्या विरोधात गेल्याने बाहेरचे नेतृत्व झुगारल्याचे स्पष्ट
* युती झाली तर सत्ता गमावण्याची वेळ येणार. आघाडीचा विचार करावा लागणार

भाजपला फायदा
* निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीपुढे कडवे आव्हान उभे करण्यात यश
* महापालिकेची सत्ता मिळण्याची शक्‍यता बळावली
* बहुजनांसह-अल्पसंख्याक मते वळविण्यास मदत
* बाहेरचे नेतृत्व झुगारून पहिल्यांदाच स्थानिकांचे सामूहिक नेतृत्व

Web Title: azam pansare entry in bjp party