पुणे विद्यापीठ घडवणार ज्वेलरी डिझाईनर्स; पदवी अभ्यासक्रमाला होणार सुरवात

ब्रिजमोहन पाटील
Wednesday, 18 November 2020

सध्या जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन या क्षेत्राने संपूर्ण जगातील उद्योजकांचे लक्ष आकर्षित केलं आहे. पुणे विद्यापीठात 'जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' यावर संशोधन केलं जाईल. 

पुणे : कौशल्य विकासावर अधारीत शिक्षण देण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून होत आहेत. यामध्ये आता उत्तम दर्जाचे दागिने घडविणारे सुवर्णकार घडविण्यासाठी विद्यापीठाने पाऊल टाकले आहे. पुणे विद्यापीठात मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी या संस्थेच्या मदतीने 'जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा तीन वर्षांचा बीए पदवी अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. 

नवा कृषी कायदा शेतकऱ्यासाठी ठरला फायदेशीर; तक्रार दाखल करताच मिळाली भरपाई​

या अभ्यासक्रमाच्या सामंजस्य करारावर बुधवारी (ता.१८) स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉ.(कॅप्टन) चंद्रशेखर चितळे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी (IIGJ), मुंबईचे अध्यक्ष किरीट भन्साळी, इन्स्टिट्यूटचे प्रमुख संजोय घोष, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर, पुणे (MCCIA) चे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप भार्गव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वित्त व लेखाधिकारी अतुल पाटणकर आदी उपस्थित होते. 

 कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, 'बी. ए. इन जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा अभ्यासक्रम नोकरीभिमुख अभ्यासक्रम असल्याने १२वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक उत्कृष्ट अशी संधी आहे. सध्या जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन या क्षेत्राने संपूर्ण जगातील उद्योजकांचे लक्ष आकर्षित केलं आहे. पुणे विद्यापीठात 'जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' यावर संशोधन केलं जाईल. 

प्राध्यापकांचे पगार वेळेत करा, अन्यथा...; उच्च शिक्षण संचालक आदेशात काय म्हणाले?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरीचे (आआयजीजे) अध्यक्ष किरीट भन्साळी म्हणाले, 'हा एक नाविन्यपूर्ण असा अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना जेम्स अँड ज्वेलरी डिझाईनशी निगडित उद्योगांमध्ये भरपूर संधी भविष्यात उपलब्ध होणार आहेत. पुणे विद्यापीठाशी जोडले गेल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. केंद्र सरकारने 'आयआयजीजे'ची स्थापना २००२ मध्ये केली, ज्वेलरी उद्योगासाठी जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. 
 
स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे संचालक डॉ.(कॅप्टन) चंद्रशेखर चितळे म्हणाले, 'बी. ए. इन जेम्स अँड ज्वेलरी डिझाईन' हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी स्वयंरोजगार सुरू करू शकतील, अशी या अभ्यासक्रमाची रचना आहे. यावेळी सहायक प्राध्यापिका डॉ. आदिती मुखर्जी यांनी आभार मानले.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BA degree course in Gems and Jewelry Design will be started at Pune University