मृत्यू कमी करण्यासाठी ‘बालसंजीवनी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children

मृत्यू कमी करण्यासाठी ‘बालसंजीवनी’

पुणे ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बाल मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन हे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘अमृतमहोत्सवाची-बालसंजीवनी’ हे खास अभियान सुरू करण्यात येणार आहे.

प्रत्येक बालकाला जगण्याचा नैसर्गिक अधिकार मिळवून देणे आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करत, लिंग गुणोत्तर वाढीस हातभार लावणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी या अभियानाची सुरवात केली जाणार आहे.

२४ डिसेंबरपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि बालविकासाचे प्रयत्न अशा दोन्ही बाबींची सांगड या अभियानात घालणार आहे. यासाठी बालकांच्या वेशभूषेद्वारे स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची माहिती देणार आहे. गर्भवती आणि स्तनदा मातांना आहार, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन आणि महिलांची रक्त तपासणी करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून अतितीव्र (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका या बालमृत्यू झालेल्या घरी भेटी देऊन कारणे जाणून घेतील. त्यांच्या अहवालानुसार पुढील आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. कुपोषणामुळे दुर्धर आजार झालेल्या बालकांना विशेष शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयातील बालोपचार केंद्र आणि पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

अभियान कालावधीतील काही उपक्रम...

  • गर्भवतीस बालकांच्या उपक्रमाबाबत माहिती देणे

  • गर्भवतींना पौष्टिक आहाराविषयी मार्गदर्शन

  • स्तनदा मातांना बाळासाठी मातेच्या दुधाचे महत्त्व सांगणे

  • माहेरवाशीण गर्भवतींना व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन

  • शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची १०० टक्के तपासणी करणे

  • तपासणीच्या वेळी बालकांना वजनवाढीची व जंतनाशक औषधे देणे

loading image
go to top