पाण्याचे समान वाटप महत्त्वाचे; महाराष्ट्राविषयी बाबा आढाव काय सांगतात?

Baba-Aadhav
Baba-Aadhav

सामाजिक चळवळीचा चालता-बोलता संदर्भकोश म्हणजे बाबा आढाव. अनेक कायद्यांचे प्रणेते असलेल्या बाबांचे वय ९१ असले तरी, समाजासाठी त्यांना अजून खूप काही करायचे आहे, अन् त्यासाठीही ते अजून सक्रिय आहेत. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्याची वाटचाल कशी असावी, याविषयी त्यांनी मांडलेली मते...

प्रश्न - महाराष्ट्राने साठ वर्षांत काय कमावले?
डॉ. आढाव -
 राज्याची साठ वर्षांत वाटचाल चांगली झाली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली. कृषी, सहकार, उद्योग, कामगार, शिक्षण आणि सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात चांगली भरभराट झाली. सामाजिक चळवळींनीही विकासाची दिशा दाखविली. साखर कारखान्यांमुळे नेतृत्वाची नवी फळी उदयाला आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना नेतृत्त्वाची संधी मिळाली. सिंचनाचे क्षेत्र वाढले. दुग्धव्यवसाय, वीज निर्मिती वाढली. दळणवळणाची साधने विस्तारली. विज्ञान-तंत्रज्ञानामुळे विकास झाला.  
 
पुढील दोन दशकांत महाराष्ट्र कोठे असेल?
    विकास प्रक्रियेत सातत्य राहिले, तर महाराष्ट्राचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे. राज्याचा सामाजिक व आर्थिक विकास आराखडा बनवून त्याची अंमलबजावणी करावी. मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे. पाण्याचे समतोल वाटप झाले नाही तर, पुढील काळात विपरित परिणाम राज्याला भोगावे लागतील. माझ्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. इतकेच नाही तर, पुढच्या दशकाचा विचार करण्यापूर्वी कोरोनानंतरचा महाराष्ट्र कसा असेल, याची मला चिंता आहे. शेती हा प्रधान उद्योग-व्यवसाय होत असताना, शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. शेतकऱ्याला सामाजिक प्रतिष्ठा देण्यास एक वर्ग अजूनही तयार नाही. शेतमालास हमी भाव पाहिजे, या मागणीची अजूनही पूर्तता झालेली नाही. कामगारांच्या कौशल्यात वाढ होण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबवावा.   

प्रगतीतील आव्हाने कोणती आहेत?
    पाण्याच्या समतोल वाटपाबरोबरच विकासाचा प्रादेशिक असमतोल, हा काळजीचा विषय आहे. विकास हा मुंबईकेंद्रीत होत आहे. राजकीय नेतृत्त्वही तसाच विचार करीत आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक या त्रिकोणातच उद्योग-व्यवसाय विस्तारलेत. प्रादेशिक असमतोल वाढत आहे. पुढच्या काळात उद्योगांचे विकेंद्रीकरण गरजेचे आहे. बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे. नोकऱ्यांत मक्तेदारी निर्माण होऊ नये. असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुढचा विचार करताना या वर्गाकडे दुर्लक्ष करणे, आपल्याला परवडणारे नाही. दुसरीकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांचे खुनी सापडत नाहीत, याचे वैषम्य आहेच. सीमा प्रश्नही भिजत पडलाय.
 
महाराष्ट्राच्या वाटचालीतील सर्वांत महत्त्वाचे क्षण कोणते?
    सामाजिक चळवळींच्या माध्यमातून अनेक कायदे झाले, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली गेली नाही, हे नशीब! महाराष्ट्राने मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या. मराठवाडा, पुणे विद्यापीठाला अनुक्रमे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. रोजगार हमी योजना आली. भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र वर्गवारी झाली. प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसन कायदा, सामाजिक सुरक्षा कायदा, माथाडींसाठी कायदा, माहिती अधिकार कायदा आला हे चांगले झाले. 

डॉ. आढाव म्हणतात...

  • राज्याला राजकीय नेतृत्त्वाची चांगली परंपरा आहे. पण सध्याच्या राजकारणाचा पोत ढासळत आहे. या नेत्यांना काही नीती-मूल्ये आहेत की नाही, असा प्रश्न आहे.
  • जनतेनेच जनतेचा जाहीरनामा तयार केला पाहिेजे. अन् त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.
  • पुतळे उभारून समाजाला गुंगारा देऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com