रस्त्याच्या कामाची कासवाला लाजवेल अशी चाल; ठेकेदार बदलूनही परिस्थिती बदलेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sinhgad Road Condition

खडकवासला गावातून जाणाऱ्या मुख्य सिंहगड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवासी, व्यावसायिक व पर्यटक यांचे हाल होत आहेत.

रस्त्याच्या कामाची कासवाला लाजवेल अशी चाल; ठेकेदार बदलूनही परिस्थिती बदलेना

किरकटवाडी - खडकवासला गावातून जाणाऱ्या मुख्य सिंहगड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवासी, व्यावसायिक व पर्यटक यांचे हाल होत आहेत. ठेकेदार बदलला तरी कामाची गती 'कासवालाही लाजवेल' अशी असल्याने परिस्थिती सुधारताणा दिसत नाही. 'एखाद्या वाडी-वस्तीवर जाणारी पायवाट बरी' असे म्हणत नागरिक या मुख्य सिंहगड रस्त्याविषयी संताप व्यक्त करत आहेत.

मागील चार वर्षांपासून नांदेड फाटा ते डोणजे फाटा या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिंहगड रस्त्याचे काम सुरू आहे. एवढे दिवस होऊनही खडकवासला व गोऱ्हे बुद्रुक या गावांच्या हद्दीत अद्यापही काम अपूर्ण आहे. अगोदरचा ठेकेदार काम करण्यास विलंब करत असल्याचे कारण पुढे करत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्याकडून काम काढून घेतले व काही महिन्यांपूर्वी नवीन ठेकेदाराला काम दिले मात्र अद्याप परिस्थिती 'जैसे थे' असल्याने नागरिकांची खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून सुटका झालेली नाही. पावसामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून आता धुळीचाही त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे कामाचा वेग वाढवून लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

'खेडेगावामध्ये यापेक्षा चांगले रस्ते असतात. मुख्य रस्ता असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाहीत. शब्दात सांगता येणार नाही अशी सध्याची रस्त्याची स्थिती आहे. केवळ खडकवासला गावातील नाही तर पुढील पानशेत पर्यंतच्या नागरिकांना व पर्यटकांना या खराब रस्त्यामुळे मनःस्ताप सहन करावा लागत आहे.'

- राहुल मते, नागरिक, खडकवासला.

'दिवसातून दोन तीन वेळा दुकानातील धूळ साफ करावी लागते. वाहनांचे प्रमाण जास्त असल्याने धुळीचा त्रासही जास्त आहे. आरोग्यासह व्यवसायावरही याचा परिणाम होत आहे. रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.'

- गोपाळ कुलकर्णी, व्यावसायिक, खडकवासला.

'खडकवासला धरण चौकात कामाला सुरुवात केली आहे. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतूकिला अडथळा न येता काम करावे लागत आहे. कामाचा वेग वाढविण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सांगण्यात येईल.'

- आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

टॅग्स :puneBad RoadContractor