Video : रद्दीच्या कागदातून पिशव्या अन सामाजिकतेचा वसाही

Vasudha-Kulkarni
Vasudha-Kulkarni

जुन्या लग्नपत्रिका व विविध समारंभाच्या निमंत्रण पत्रिकांचा उपयोग करून वसुधा संगमेश्वरकर- कुलकर्णी निरनिराळ्या आकार, प्रकारातील पाकिटं बनवतात. रद्दी कागदाच्या पिशव्या तयार करतात. स्वतःचा हा छंद विस्तारत त्यांनी अनेक विद्यार्थिनींना याची गोडी लावली आहे.

हाडाची कलावंत व शिक्षिका असलेली व्यक्ती आपल्याकडे शिकणाऱ्यांना सहजपणे एखादं जीवनकौशल्य कशी शिकवते, याचं उदाहरण म्हणजे वसुधा संगमेश्वरकर-कुलकर्णी. हुजूरपागा शाळेत माध्यमिकसाठी त्या पर्यवेक्षिका म्हणून काम पाहतात. चित्रकला शिक्षिका या नात्याने दीर्घकाळ कार्यरत असताना त्यांनी कलाशिक्षणाचा काळानुरूप उपयोग करून घ्यायला विद्यार्थिनींना उद्युक्त केलं, हे त्यांच्या कारकिर्दीतील टप्पे बघताना लक्षात येतं.

वसुधाताई म्हणाल्या, ‘‘रद्दी कागदाचा पुनर्वापर करून पिशव्या बनवण्याचा प्रकल्प शाळेत १५ वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थिनी आवडीने पिशव्या तयार करतात. त्यावर पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करणारे संदेश लिहितात. साजेशी चित्रं काढतात. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना अशा पिशव्या भेटी दिल्या जातात. याप्रमाणेच ‘सृजनशील उपयोजित कला’ या उपक्रमांतर्गत कागदी पिशव्यांच्या बरोबरीने जुन्या जाडसर कागदांचा वापर करून फोल्डर व पाकिटं बनवली जातात. या कलेचा व्यावसायिक उपयोग होऊ शकतो. छंदवर्ग या उपक्रमातही अशा वस्तू बनवायचं प्रशिक्षण आम्ही देतो.’’

वसुधाताई जुन्या लग्नपत्रिका व विविध समारंभाच्या निमंत्रण पत्रिकांचा उपयोग करून निरनिराळ्या आकार, प्रकारातील पाकिटं बनवतात. लहान, मध्यम व मोठ्या आकारातील या पाकिटांवर पानं-फुलांची सजावट असते. पाकिटांसाठी पत्रिका कापताना बाजूला पडणाऱ्या कागदाच्या कलात्मक पुनर्वापरातूनच ही बहुरंगी सजावट साकार होते. मोठ्या जाडसर पाकिटात महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवता येतात. शिवाय कित्येक छोट्या वस्तू आकर्षक छोट्या पाकिटांमध्ये ठेवल्यास त्या वेळच्यावेळी सापडायला मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com