MPSC Exam : बहिरवाडीच्या शेतकरी पुत्राची तिहेरी यशास गवसणी

बहिरवाडी (ता. खेड) या छोट्याशा खेड्यातील सागर राक्षे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत देदीप्यमान कामगिरी केली असून, तिहेरी यश संपादन केले.
Sagar Rakshe
Sagar RaksheSakal

राजगुरुनगर - बहिरवाडी (ता. खेड) या छोट्याशा खेड्यातील सागर राक्षे या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत देदीप्यमान कामगिरी केली असून, तिहेरी यश संपादन केले.

सागर सुनील राक्षे याने प्रथम नगरपरिषद करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. त्यानंतर दिलेल्या एमपीएससी परीक्षेत तो राज्य विक्रीकर निरीक्षक पदासाठी पात्र ठरला. याच परीक्षेची एक महिन्यानंतर सुधारित गुणवत्ता यादी जाहीर झाली, त्या यादीत तो सहाय्यक कक्ष अधिकारी (मंत्रालय) या पदासाठी पात्र ठरला. अशा प्रकारे २०२४ या वर्षात त्याने एमपीएससी परीक्षेमधून तीन पदांना गवसणी घातली.

सागरचे आईवडील शेतकरी आहेत. सागरने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याचे सातवी पर्यंतचे शिक्षण गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. नंतरचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयात, तर बारावीपर्यंतचे शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात झाले. पुढे लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी घेतली.‌

पदवी नंतर लगेच नोकरी उपलब्ध नसल्याने करिअरचा मोठा प्रश्न होता. स्पर्धा परीक्षांबद्दल जुजबी माहिती होती. स्पर्धा परीक्षांबद्दल अधिक माहिती आणि पूर्वतयारी करावी म्हणून ठाण्याला युनिक अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो राजगुरुनगरला परतला. त्यानंतर येथील स्वर्गीय बाळासाहेब आपटे अभ्यासिकेत सहा वर्षे सातत्यपूर्ण अभ्यास केला.

तो राज्यसेवा मुख्य, राज्य विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक या परीक्षा देत राहिला. दरम्यान त्याने सारथीची परीक्षा देऊन छात्रवृत्ती मिळविली, त्यामुळे खर्चाचा भार हलका झाला.‌ या प्रवासात अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले पण २०२४ या वर्षी मात्र त्याने यशाचे शिखर सर केले.‌

या यशानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, सरपंच वसुधा राक्षे, माजी सरपंच जगन्नाथ राक्षे यांच्यासह ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com