esakal | बहुरुप्यांचा जगण्यासाठी संघर्ष

बोलून बातमी शोधा

बहुरुपी कलाकार

बहुरुप्यांचा जगण्यासाठी संघर्ष

sakal_logo
By
टीम इ सकाळ

येरवडा : ते व्यवसायाने पोलिस, वकील आणि डॉक्टर नाहीत. पण बहुरुपी म्हणून ते पोलिस, वकील, डॉक्टर बनून फिरतात. गावोगावातील यात्रा, सण, उत्सवात देव-देवतांपासून ते राक्षसापर्यंतची रूपे धारण करून लोकांचे मनोरंजन करतात. मात्र, गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये हा समाज शहरात कुठे दिसला नाही. यावर्षी वारजे गावठाणाजवळ नागपंथी डवरी कुटुंबाचा तात्पुरता मुक्काम आहे. या पालातील ३५ जण गेल्या दहा ते बारा दिवसांपासून एकवेळच्या जेवणासाठी संघर्ष करीत आहेत.

भटक्या विमुक्त समाजातील नाथपंथी डवरी समाज तसा राज्यभर विखुरलेला आहे. हा समाज परंपरागत बहुरुपी म्हणून ओळखला जातो. पुरुष मंडळी पोलिस, वकिल आणि डॉक्टरांची हुबेहुब वेशभुषा करून लोकांचे मनोरंजन करतात. पोलिस वेशातील बहुरुपी हुबेहुब पोलिसांची नक्कल करतात. मात्र, नक्कल करताना बिन पगारी, फुल अधिकारी हे वाक्य उच्चारताच समोरच्या लोकांना हे बहुरूपी असल्याचे कळते. त्यानंतर त्यांच्यावर खुष होऊन लोक पैसे देतात. त्यांच्या कलेला स्वत: पोलिस अधिकारी दाद देतात. गावोगावातील यात्रा, सण, उत्सवात ते देव-देवतांपासून ते राक्षसा पर्यंतची वेशभुषा करून बक्षीस रुपात मिळालेल्या पैशातून आपली उपजिविका करतात.

पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज अजूनही राज्यभर भटकंती करीत आहे. गावकुसाबाहेर पालामध्ये राहून दिवसभर गावात किंवा शहरात बहुरुपी लोकांचे मनोरंजन करतात. प्रत्येक बहुरुप्यांची हद्द आणि गावे ठरलेली असतात. हा अलिखित नियम असतो. त्यामुळे हे बहुरुपी एकाच शहरात किंवा गावात येत नाहीत. अशीच बहुरुप्यांची दहा कुटुंब वारजे गावठाणाच्या बाहेर वसली आहेत. लॉकडाउनमध्ये त्यांना बाहेर जाऊन लोकांचे मनोरंजन सुद्धा करता येत नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील ३५ ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांचे हाल होत असल्याचे बहुरूपी तानाजी शिंदे यांनी सांगितले.

‘‘ दौंड तालुक्यातील पाटस या गावचे असून बहुरूपी म्हणून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी शहरात आलो होतो. मात्र, लॉकडाउन लागल्यामुळे बाहेरही जात येत नाही. त्यामुळे लहान मुलांस महिलांची उपासमार होत आहे. काय करावे हे समजत नाही. ’’

- तानाजी शिंदे, बहुरुपी