वनविभागाची दोनशे कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court

महसूल मंत्र्यांचा बनावट आदेश तयार करून त्याआधारे वनविभागाची दोनशे कोटी रुपये किमतीची जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

वनविभागाची दोनशे कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन फेटाळला

पुणे - तत्कालीन महसूल मंत्र्यांचा बनावट आदेश तयार करून त्याआधारे हडपसर येथील वनविभागाची सुमारे दोनशे कोटी रुपये किमतीची सात हेक्टर जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. राकेश अशोक उफाळे (वय ३८, रा. पार्क इनफेनिया, भेकराईनगर, हडपसर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे.

याबाबत, हवेलीच्या तहसीलदार यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने त्यांच्या साथीदारांच्या वतीने हडपसर येथील सर्व्हे नं.६२ येथील सात हेक्टर ६८ आर या मिळकतीवर सात बारा कब्जेदारी मालकी हक्काने नावाची नोंद करण्याबाबतची मागणी महसूल मंत्र्यांकडे केली होती. मात्र संबंधित जमीन कृषीक प्रयोजनासाठी वाटप करून मिळण्याची उफाळे याची विनंती फेटाळण्यात येत असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतरही आरोपीने अन्य साथीदारांच्या मदतीने तत्कालीन महसूल मंत्री आणि आत्ताचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने आदेश बनावट आदेश तयार केला. त्याआधारे हवेलीच्या तहसीलदारांकडे जागेच्या सात बारा नावाची नोंद होण्यासाठी सादर करून त्यावर नावे लावून शासनाची जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी उफाळे याने अर्ज केला. त्यास सहायक सरकारी वकील रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी विरोध केला. बनावट निकालपत्र तयार करण्यामध्ये उफाळे याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याने बनावट निकालपत्र तयार करून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे, असे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

उफाळे कुटुंबीयांचे मुख्य आरोपीबरोबर आर्थिक व्यवहार -

उफाळे, त्याची पत्नी व मुख्य आरोपी पोपट शितकल यांमध्ये तेरा लाखांचे आर्थिक व्यवहार झाले असल्याबाबत मुख्य आरोपीच्या बँक खात्यातून दिसून येत आहे. त्याच्या खात्यावरून अन्य आरोपीच्या खात्यावर दीड लाखांची रक्कम पाठविण्यात आल्याचे दिसून येत आहे. आरोपींची टोळी असून त्यांनी आपआपसात कट रचून बनावट निकालपत्र तयार केले, असा युक्तिवाद अ‍ॅड. देशपांडे-कर्जतकर यांनी केला.

Web Title: Bail Of One Rejected For Trying To Grab Land Of Forest Department Worth 200 Crores Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..